कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात कृती समितीच्या कामाबाबत जनतेमध्ये विश्वासार्हता आहे. टोल सह विविध प्रश्न कृती समितीने जनआंदोलने उभी करून मार्गी लावले आहेत. अशा अनेक चळवळीत कोल्हापूरचा नागरिक म्हणून राजेश क्षीरसागर यांच्यासह आम्ही शिवसेनेचे सर्वच पदाधिकारीही अग्रभागी राहिलो आहे. त्यामुळे कृती समितीची विश्वासार्हता टिकून राहणे गरजेचे आहे. काल महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत साडेचार हजार कोटी केवळ कागदावरच, साडेचार हजार कोटी गेले कुठे? अशा पद्धतीची वक्तव्ये करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीबद्दल जनतेमध्ये साशंकता निर्माण करण्याचा एकप्रकारे प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कृती समितीतील प्रतिनिधी हे जाणकार आहेत त्यांना निधी मंजुरीच्या प्रक्रीयेबाबत माहिती असणे आवश्यक आहे. कोणताही निधी मंजूर होत असताना किंवा विकासकाम होत असताना त्याकरिता आवश्यक निधी हा टप्प्याटप्प्याने संबधित खात्याकडे वर्ग केला जातो. या शासकीय प्रक्रीयेबद्दल कृती समितीचे सदस्य अज्ञभित असणे अशक्य आहे. मंजूर केलेला निधीतून टप्प्याटप्प्याने कामे केली जात आहेत व होणार आहेत हे समस्त कोल्हापूरवासियांना माहित आहे. पूरस्थिती नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून मंजूर रु.३२०० कोटी निधीतून करावयाच्या उपाययोजनांचे विविध टप्पे करण्यात आले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरसाठीही रु.२७७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरणही जिल्हा प्रशासनाने केले आहे. रंकाळा तलावावर सुरु असलेल्या सुशोभीकरणाची छायाचित्रे प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत. रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभास कृती समितीमधील सदस्य नारळ फोडायला होते. पंचगंगा नदी घाटावरील विद्युतीकरणाद्वारे केलेले सुशोभिकरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. हे वास्तविक चित्र कोल्हापुरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत असताना कृती समितीने केलेली वक्तव्ये ही जनसामान्यात गैरसमज निर्माण करणारी होत आहेत. यामुळे कृती समितीच्या जनसामान्यातील विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. ही विश्वासाहर्ता टिकणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
यात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूर शहराच्या इतिहासात आजतागायत कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर झाला नाही. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे ४५०० कोटींचा निधी मंजूर केला. याची माहिती समस्त कोल्हापूरवासियांना आहे. मंजूर केलेल्या निधी अंतर्गत होणाऱ्या कामांचे उद्घाटन करण्याचा हक्कही निधी मंजूर करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असणे साहजिकच आहे. परंतु, मंजूर केलेला निधी मिळालाच नाही कागदावरच आहे अशी भूमिका घेवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण होईल अशी वक्तव्ये जाणकार कृती समितीकडून होणे आश्चर्यकारक आहे.
गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात विकासाचे काम सुरु आहे. कोल्हापूरच्या विकासाचेच ध्येय ठरवून महानगपालीकेस निधी मंजूर केला जात आहे. परंतु, कालच्या बैठकीतून जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीबाबत साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूरला मिळालेला निधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेला निधी याची तुलना कृती समिती सदस्यांनी करावी आणि एकप्रकारे सुरु असलेला पक्षपातीपणा थांबवून कोल्हापूरच्या विकासाच्या मार्गात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही या पत्रकाद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले आहे.