गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि मंडळांनी समन्वय साधावा : राजेश क्षीरसागर
गणेशोत्सव २०२४ च्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक
कोल्हापूर दि. ४ (:प्रतिनिधी)
कोल्हापूर शहराला सुमारे सव्वाशे वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा
लाभली आहे. कोल्हापूरात गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. कोल्हापूरवर येणाऱ्या प्रत्येक संकटात नागरिकांना आधार देण्याचे काम शहरातील सर्वच तालीम संस्था आणि गणेश मंडळांळे अहोरात्र करतात. प्रसंगी महापुरासारख्या परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून बचावकार्यात मंडळांचे कार्यकर्ते प्रशासनाच्याही पुढे असतात. गणेशोत्सव सण हा सर्वांना सामील एकत्रित करणारा सन आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात, भक्तिभावाने आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मंडळाशी समन्वय साधावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. यासह प्रामुख्याने कोल्हापूरचा गणराया अॅवॉर्ड चर्चा संपूर्ण राज्यभर केली जाते. हा अॅवॉर्ड बंद करण्यात आला आहे. या अॅवॉर्ड मुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे प्रोत्साहन मंडळांना मिळत असून हा अॅवॉर्ड पुन्हा सुरु करण्याच्या सूचना राजेश क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनास दिल्या. यावर तात्काळ यंदापासून गणराया अॅवॉर्ड सुरु करत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसंदर्भात शहरातील तालीम संस्था, मंडळे आणि पोलीस प्रशासनाची समन्वय बैठक अलंकार हॉटेल येथे पार पडली. बैठकीच्या सुरवातीस यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भातील आढावा पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सादर केला.
यावेळी सूचना देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मे.सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाधीन राहून १२ वाजेपर्यंत साऊंड सिस्टमला परवानगी द्यावी. १२ नंतर साऊंड बंद केल्यानंतर मिरवणूकीत भयान शांतता पसरते. यामुळे विसर्जन मिरवणुकीतील उत्साह निघून जातो. गणेशोत्सवात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही हिरमोड होतो. त्यामुळे १२ नंतर मिरवणुकीतील उत्साह टिकविण्यासाठी पारंपारिक वाद्यांना परवानगी द्यावी. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यास राज्यभरातून लोक येतात. त्यामुळे या देखाव्यांनाही वेळ वाढवून द्यावी. हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांवर गणेशोत्सवात कारवाई केली जाते. त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात येवू नये. दोन मोठ्या मंडळाच्यामध्ये ५ ते ६ मंडळाचा गॅप ठेवावा. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत सकारात्मक भूमिका ठेवून यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा अशा सूचना दिल्या. यासह गणेशोत्सव मंडळांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, शहर डीवायएसपी अजित टिके, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोवार, शाहुपुरीचे सिकंदर, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सुशांत चव्हाण, राजवाडा पोलीस ठाण्याचे झाडे, शहर वाहतूकचे अनिल तनपुरे आदी उपस्थित होते.