“लाडकी बहीण” योजनेचे यश सावत्रभावांच्या डोळ्यात खुपते : राजेश क्षीरसागर
लोकसभेचा विजय ही राजघराण्यांविषयीची कृतज्ञता; आगामी विधानसभेला जनता विरोधकांना जागा दाखवेल
कोल्हापूर दि.२४ : (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी तो पराभव राजकीय नसून छत्रपती घराण्याप्रती कोल्हापूरवासीयांची असलेली कृतज्ञता आहे. स्वत:च्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल आणि दाणून पराभव होईल, या भीतीनेच राजघराण्यात उमेदवारी देण्याकरिता राजवाड्याच्या पायऱ्या कोणी झिजवल्या, हे जनतेने पाहिले आहे. खासदार छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा त्यांच्याबाबतीत कोल्हापूरवासियांचे असलेले प्रेम दाखवून देत असताना याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार माजी पालकमंत्र्याकडून होत आहे, अशी टीका
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
काल कॉंग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला राजेश क्षीरसागर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बोलतात ते करून दाखवतात. मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या भावांना विद्यावेतन यासह विशेषतः लाडक्या बहिणींचे सबलीकरण करण्यासाठी यशस्वीरीत्या राबविण्यात आलेली “लाडकी बहीण” योजना असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये निषेधार्ह असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता व लाडकी बहीण योजनेचे यश सावत्रभावांच्या डोळ्यात खुपत असल्याचे टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले कि, राज्यातील जनता दुधखुळी नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहे. जनतेला न्याय देणाऱ्या योजना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत. या योजनेतून महायुती सरकारप्रति नागरिकांची आत्मीयता वाढत असून, विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे टीका करणे आणि जनतेत गैरसमज पसरविणे याशिवाय दुसरे कामच शिल्लक नाही. लाडकी बहीण योजना बंद पडावी यासाठी मे.न्यायालयात गेले. योजनेबाबतीत गैरसमज पसरविण्याचे काम केले, अशा घरभेदी सावत्रभावांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काहीच चुकले नाही.
विरोधक सत्तेत असताना त्यांनी फक्त तोंडाची हवा वायफळ घालविण्याचे काम केले. जनहिताचे काम करणे माजी पालकमंत्र्याना कधी जमलेच नाही. टोलची पावती फाडून आपण जनतेविषयी किती आत्मीयता बाळगतो, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना आता त्यांची दिखावू आपुलकी, वरवरचे प्रेम लक्षात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला जनताच त्यांना जागा दाखवून देईल.
कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न नेहमीच माजी पालकमंत्र्याकडून केला जात आहे. कोल्हापुरात दंगल घडण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी ते करतात आणि त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होते. याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आगामी काळात जनता कोणत्याही अफवांना, भूलथापांना बळी न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या पाठीशी ठाम उभी राहील आणि विरोधकांना त्यांच्या जागा दाखवेल, असा विश्वास व्यक्त केला.