राजर्षि छत्रपती कृषि महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधात्मक सप्ताह
कोल्हापूर दि. २२ : (प्रतिनिधी )
रॅगिंग म्हणजे मानसिक हिंसा असून तो एक सामाजिक धोका आहे आणि शैक्षणिक संस्थांच्या आवारात अशा अमानवीय व्यवहारांना थारा नाही. रॅगिंग करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी दोन वर्षांच्या शिक्षा, आर्थिक दंड आणि महाविद्यालयातून बडतर्फी तर होतेच त्याशिवाय असे विद्यार्थी समाजात अपमानित होतात, त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात विदयार्थ्यांनी असे प्रकार करू नयेत, असे प्रतिपादन राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
डॉ. रविंद्र बनसोड यांनी केले. महाविद्यालयात साजऱ्या झालेल्या रॅगिंग प्रतिबंधात्मक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण व अधिष्ठाता कृषि यांचे कार्यालयामार्फत प्राप्त निर्देशानुसार दि. १२ ऑगस्ट या रॅगिंग प्रतिबंधात्मक दिवसापासून राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग विरोधी जागृती करण्यासाठी काव्यलेखन व वाचन, गीतगायन, निबंधलेखन, पथनाट्य सादरीकरण, वादविवाद स्पर्धा यासोबतच भित्तीपत्रक सादरीकरण व रांगोळी रेखाटन अशा विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या स्पर्धांमध्ये संध्या पारखे हिने घोषवाक्यलेखनासाठी प्रथम क्रमांक मिळविला, प्रसाद मासाळ याने काव्यलेखन तर प्राजक्ता पाटील हिने निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. गायन स्पर्धेत वसुंधरा वाडकर हिने तर वादविवाद स्पर्धेत ग्रीष्मा आणि अस्मिता काळे यांनी विजेतेपद मिळविले. रांगोळी स्पर्धेत नम्रता कांबळे हिने आणि भित्तीपत्रक रेखाटन स्पर्धेत शरयू खोत हिने प्रथम क्रमांक मिळविला, पथनाट्य स्पर्धेत ओंकार सरपणे आणि त्याच्या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.शैलेंद्र कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी इंजी.अजय देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक वसतिगृह कुलमंत्री व रॅगिंग प्रतिबंधात्मक सप्ताहाचे समन्वयक डॉ.ऋषिकेश सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन यशवंत तांबे, श्रुतिका कुलकर्णी, ऋतुजा शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थिनी वसतिगृहाच्या उपकुलमंत्री डॉ. रेणुका शिंदे यांनी केले.
या सप्ताहातील विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी उपकुलमंत्री डॉ. सुनीता वाघमारे, सौ. मीनाताई पाटील, डॉ. जयश्री भोलाणे, डॉ. विजय नाळे, डॉ. अभय जाधव, डॉ. जगदीश पाटील, डॉ. संदीप पाटील यांच्यासह सुहास लोंढे व प्राजक्ता खैरनार यांनी परिश्रम घेतले.