राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने समाजातील सर्वच घटकांसाठी महत्त्वपूर्ण योजनांद्वारे न्याय देण्याचे काम केले आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी, कामगार या सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील माता भगिनींचे सशक्तीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नुसती घोषणाच केली नाहीत तर ती अंमलात आणून राखीपौर्णिमेपूर्वीच लाखो भगिनींच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली आहे. या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी व्हावी. या योजनेपासून एकही लाभार्थी महिला वंचित राहू नये. यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहेत. यासह महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने शासन राबवीत असलेल्या इतर योजनांची माहिती भगिनींना व्हावी, या उद्देशाने कोल्हापुरात दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापुरातील तपोवन मैदानावर महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला तपोवन मैदानाची पाहणी महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींनी केली. यासह उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने उपस्थित राहणाऱ्या महिला भगिनींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केल्या. प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधीसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था करून त्यांना प्रवेशासंदर्भात पूर्वकल्पना द्यावी. यातून कोणताही गोंधळ निर्माण होता कामा नये, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, शिवसेना निरीक्षक शरद कणसे, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रविंद्र माने, रणजीत जाधव, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, राष्ट्रवादीचे आदिल फरास, विभागीय आयुक्त पुणे चंद्रकांत कुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, आयुक्त के.मंजूलक्ष्मी आदी उपस्थित होते.