मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर कोल्हापुरात मेळावा; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
कोल्हापूर, दि. २० : (प्रतिनिधी )
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी महत्त्वपूर्ण योजनांद्वारे योगदान दिले आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी, कामगार या सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील माता भगिनींचे सशक्तीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नुसतीच घोषणाच केली नाहीत तर ती अंमलात आणून राखीपौर्णिमेपूर्वीच लाखो भगिनींच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली आहे. या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी व्हावी. या योजनेपासून एकही लाभार्थी महिला वंचित राहू नये. यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. यासह महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने शासन राबवत असलेल्या इतर योजनांची माहिती भगिनींना व्हावी, या उद्देशाने कोल्हापुरात दि.२२ ऑगस्ट रोजी तपोवन मैदानावर महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महिला सन्मान सोहळा यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, मेळावा यशस्वी करण्याकरिता कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर कोल्हापुरात महिला सन्मान सोहळा पार पडणार असून, या मेळाव्यास राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहितीही क्षीरसागर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिला संदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंगलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ हा लाभार्थी महिलांपर्यंत पोहचविणे हा त्यामागील उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी अशा पद्धतीची योजना यशस्वीरीत्या राबविली गेली आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लाभार्थी महिलांशी संवाद साधणार आहेत. कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने ४० ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे सुमारे ४० हजार महिलांचे अर्ज स्विकारण्यात आले. यापैकी बहुतांश महिलांच्या खात्यांवर पैसे जमा झाले असून, उर्वरित अर्जांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून या योजनेच्या लाभार्थी भगिनींचा आकडा लाखांच्या घरात असून, या सर्व महिलांना मेळाव्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन ज्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे, अशा सूचना दिल्या.
या बैठकीस शिवसेना कोल्हापूर जिल्हा निरीक्षक शरद कणसे, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, समन्वयक पूजा भोर, गीता भंडारी, मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, गौरी माळदकर, पूजा शिंदे, सुनिता भोपळे, नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, पूजा आडदांडे, प्रिती अतिग्रे, राधिका पारखी, सना अत्तार, वैशाली उगवे, स्मिता चौगुले आदी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.