महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली क्षीरसागर यांची भेट
कोल्हापूर दि.१६ (:प्रतिनिधी )
राज्यातील अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन २०२३ – २४ नुसार वाढीव टप्पा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आंदोलन हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून आपल्या मागण्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांनी विधिमंडळात दि.१२ जुलै २०२४ रोजी जून २०२४ पासून वाढीव २० टक्के अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार तात्काळ वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा, अशी मागणी केली.
यावर श्री.राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांच्या खासगी सचिवांशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. तसेच मंत्री केसरकर यांच्याशी संवाद साधून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. या मागणीसंदर्भातील प्रस्ताव येत्या बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार असून, त्यास मान्यता दिली जाणार आहे. त्याचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती दिली. क्षीरसागर यांच्या तात्काळ पाठपुराव्याने विना अनुदानित शाळा कृती समितीला दिलासा मिळाला असून, समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरणे, अनिल देसाई, केदारी मगदूम, अनिल लायकर, अभिजीत कोतेकर, भानुदास गाडे, शशिकांत खडके, मच्छिंद्र जाधव, सचिन चौगुले, सचिन आंबी, संदीप चव्हाण, राजू भोरे, अरविंद पाटील, शिवाजी खापणे, शितल जाधव, भाग्यश्री राणे, नेहा भुसारी, रेखा संकपाळ आदी उपस्थित होते.