संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सात दिवसात सादर करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनास आदेश : राजेश क्षीरसागर यांची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरध्वनीद्वारे राजेश क्षीरसागर व आयुक्तांशी चर्चा
कोल्हापूर दि.०९ : (प्रतिनिधी )
कलापूरची रंगभूमी आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एक अतूट समीकरण आहे. रंगभूमीच्या एकूणच प्रवासाचं हे नाट्यगृह प्रमुख साक्षीदार असून, इथला प्रत्येक रंगकर्मी जगाच्या रंगभूमीवर गाजला. कोल्हापूरची अस्मिता असलेले हे नाट्यगृह आगीत बेचिराख होताना मनाला अत्यंत वेदना झाल्या. घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. आज सकाळी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून, नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनास दिले असल्याचे माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
आज सकाळी नाट्यगृहाच्या परिसराची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांना नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी झालेल्या नुकसानीची माहिती घेत श्री.राजेश क्षीरसागर यांनी पुनर्बांधणीसाठी आवश्यक आराखडा तात्काळ तयार करावा. नाट्यगृहाचा ऐतिहासिक पणा कायम राहिल अशा पद्धतीने आराखडा तयार करावा. यामध्ये कलाकारांना व या क्षेत्राशी संबधित अनुभवी व्यक्तींची मते विचारात घेवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, घडलेली घटना दुर्दैवी असून, कोल्हापूरवासीयांच्या मनावर आघात करणारी आहे. या राखेतून नाट्यगृह पुन्हा उभारी घेईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकार सक्षम आहे. काल तात्काळ रु.१० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यासह आवश्यक तो सर्व निधी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, कलाकार आणि कोल्हापूरवासीयांच्या भावना ओळखून तात्काळ निधी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर मानत असल्याचे सांगितले.
यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी, उपायुक्त राहुल रोकडे, शहरअभियंता नेत्रदिप सरनोबत, अग्निशमन दलाचे प्रमुख मनिष रणभिसे आदी उपस्थित होते.
*क्षीरसागर यांचा कलाकारांना दिलासा; साहित्याच्या नुकसानीसाठी रु.५ लाखांची वैयक्तिक मदत जाहीर*
नाट्यगृहाच्या भेटीदरम्यान परिसरात अनेक कलाकारांशी राजेश क्षीरसागर यांनी संवाद साधला. यावेळी कलाकारांनी भावनिक होत आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली. या कलाकारांची राजेश क्षीरसागर यांनी आपुलकीने चौकशी करून दिलासा दिला. नाट्यगृहात नाटकाच्या पुढील प्रयोगासाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उध्वस्थ झाल्याची माहिती उपस्थित कलाकारांनी श्री.राजेश क्षीरसागर यांना दिली. यावर तत्परतेने राजेश क्षीरसागर यांनी या नुकसानीसाठी रु.५ लाखांची वैयक्तिक मदत जाहीर केली. यावेळी अभिनेते अनंत काळे, अभिनेत्री छाया सांगावकर, प्रसाद जमदग्नी, गोरक्षनाथ कालेकर, संतोष शिंदे, रमेश सुतार, सागर बगाडे, सुनील घोरपडे, राज पाटील, मुकुंद सुतार यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.