मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहिती
o
कोल्हापूर दि.०८ : (प्रतिनिधी)
नावाप्रमाणेच राजेशाही थाट निभावणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी आहे. पण या वास्तूच्या पुन:उभारणी साठी तात्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
घटनास्थळी राजेश क्षीरसागर यांनी तातडीने धाव घेत आवश्यक सूचना उपस्थित जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासनास दिल्या. घटनास्थळी उपस्थित राजेश क्षीरसागर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ टर्न टेबल लॅडर, विमानतळ प्रशासनाचे अग्निशमन वाहन पाचारण केले.
या संपूर्ण घटनेची माहिती श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविली. संपूर्ण घटनाक्रमात राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, संपूर्ण नुकसानीची माहिती घेता अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे दिसते. शासनाकडून रु.१० कोटींची मदत तात्काळ मंजूर करण्यात आली आहे. अचानक लागलेल्या आगीने ऐतिहासिक वास्तू डोळ्यासमोर खाक होणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. सरकार या वास्तूच्या पुनः उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल. यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या आमदार, खासदार फंडातून निधी देवून कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.