ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो, भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून, अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते. या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने “राजेश युथ फेस्टिव्हल” चे रविवार ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत “मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर” येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कलाकृती चित्रकला स्पर्धा, सौंदर्य स्पर्धेसह डीजे पार्टी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासह विशेषतः उपस्थित युवा वर्गास निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पुष्कराज क्षीरसागर म्हणाले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गेली १२ वर्षे फ्रेन्डशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाची भव्यता वाढविण्यात आली असून महाविद्यालयीन युवा वर्गास शिक्षणासोबतच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची संधी राजेश युथ फेस्टीव्हलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत ४ ऑगस्ट या मैत्री दिनी मेरी वेदर ग्राउंड येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हल अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ ४ रोजी मेरी वेदर मैदान येथे सायंकाळी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता फेस्टीव्हलची सुरवात होणार आहे. यावेळी युवा वर्गा साठी डीजे पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता मेरी वेदर मैदान येथे भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला आहे. राजेश युथ फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांत युवा वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी केले आहे.