श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडून “व्हेरी गुड” श्रेणी प्राप्त झाली असून इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मंडळाच्या शैक्षणिक आवेक्षण (मॉनिटरिंग) समितीने डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट मध्ये तपासणी भेट देऊन शैक्षणिक सुविधा – संसाधने, विद्यार्थी केंद्रित उपक्रम, परीक्षांचे निकाल, प्रयोगशाळांची आधुनिकता, इन्स्टिट्यूटचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासन, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटस,अध्ययन प्रक्रियेची पूर्तता, उद्योगस्नेही उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार, गुणवत्ता सुधारणा उपक्रम, संशोधन क्षेत्रातील सहभाग, इन्स्टिट्यूट मधील वेगवेगळ्या समित्यांचे कामकाज आणि गुणवत्ता, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास उपक्रम, तज्ञांची व्याख्याने, प्रकल्प सादरीकरण अशा अनेक निकषांवर इन्स्टिट्यूटची तपासणी केली. या सर्व निकषांवर इन्स्टिट्यूट अतिशय चांगली कामगिरी करत असल्याचे समितीस दिसून आले. यावेळी इन्स्टिट्यूटमधील सर्व अधिविभागांना समितीने भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परिणामी, इन्स्टिट्यूटला “व्हेरी गुड” श्रेणी देण्यात आली,असे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वीरेन भिर्डी यांनी सांगितले. “आउटकम बेसड एज्युकेशनच्या आजच्या विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक युगात डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कर्तव्यदक्ष राहील” असे त्यांनी नमूद केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे इन्स्टिट्यूटमधील सर्व उपक्रमांना मार्गदर्शन लाभले. इन्स्टिट्यूटला मिळालेल्या या गौरवाबद्दल सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन होत आहे.