कोल्हापूर ता.25: (प्रतिनिधी)
म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमाअतंर्गत परराज्यातून खरेदी करावयाच्या म्हैशी या जातिवंत व दुधाळ असाव्यात, याचबरोबर गोठ्यातील व्यवस्थापन चांगले ठेवावे, जेणेकरून खरेदी केलेल्या म्हैशी वेळेत गाभण जातील. यासाठी म्हैस दूध उत्पादकांनी संघाच्या माक्रोट्रेनिंग सेंटर मार्फत याबाबतचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन
संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे आयोजित बैठकित ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमाअंतर्गत जातिवंत म्हैस खरेदी केल्यास गोकुळ मार्फत रु. ४० हजार अनुदान देण्यात येते. जातिवंत म्हैस खरेदी योजनेस दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून जातिवंत म्हैशी खरेदी करत आहेत. त्यामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून प्रथमच जिल्ह्यातील जठारवाडी, भुयेवाडी, पाडळी बुद्रुक, मौजे सांगाव, घोटवडे, माजगाव या गावातील दूध संस्थांनी एकूण १५० म्हैशी खरेदी केल्या आहेत. या म्हैशींची सद्यस्थिती, दूधाचे उत्पादन, गुणप्रत व गाभण जाण्याचे प्रमाण या संदर्भात दूध उत्पादक, संस्था सचिव व कृत्रिम रेतन सेवक यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी पशुसंवर्धन, संकलन विभागाचे अधिकारी यांच्या समवेत गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, आणलेल्या म्हैशी गाभण राहून दुधात येण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्राधान्याने प्रयत्न करावेत अशा सूचना चेअरमन डोंगळे यांनी दिल्या.
यावेळी वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून म्हैशी खरेदी केलेल्या दूध उत्पादकांनी या म्हैशीबाबतचे आपले अनुभव सांगितले. तसेच या बैठकीसाठी आम्हाला बोलवून आमचे अनुभव व अडी अडचणी समजून घेतलेबद्दल उत्पादकांच्यावतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालकांचे आभार मानले.
या बैठकीस गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील,संचालक अभिजित तायशेटे, युवराज पाटील, संभाजी खोत (भुयेवाडी), प्रकाश खाडे (जठारवाडी), शिवाजी डोंगळे (घोटवडे), उत्तम पाटील (मौजे सांगाव), व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, व्यवस्थापक शरद तुरबेकर, दत्तात्रय वागरे, दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद संघाचे अधिकारी उपस्थित होते.