कोल्हापूर, ता.24 – (प्रतिनिधी )
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये ” गुरुपौर्णिमा” सोहळा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उत्साही उपस्थितीमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी इन्स्टिट्यूटमधील सर्व पाच अधिविभागांमध्ये तज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. याप्रसंगी गुरु, विद्यार्थी, शिक्षण यामधील संबंध अधोरेखित करणारी मनोगते विद्यार्थी आणि शिक्षक यांनी व्यक्त केली.
गुरुपौर्णिमा सोहळ्याचे उद्घाटन श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक श्री. विरेन भिर्डी, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. प्रताप पाटील (सीईओ – वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड), श्री. जॉर्ज क्रुझ (शैक्षणिक मानसशास्त्र तज्ञ), श्री. सुरजकुमार सातवेकर (करियर कौन्सिलर) , डॉ.जयदीप शिंदे ( विभागप्रमुख-सिव्हिल इंजिनिअरिंग, ए एम इन्स्टि.), बाळाराम माडकर (करिअर मार्गदर्शक, मोटिवेशनल स्पीकर) या तज्ञ व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थी आणि नागरिक म्हणून उत्तम पद्धतीने जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गुण कौशल्यांवर विस्तृत चर्चा केली. भारत आणि जगभरात विविध क्षेत्रांमध्ये होऊन गेलेल्या गुरु – शिष्य व्यक्तिमत्त्वांचे यावेळी स्मरण करण्यात आले. जीवनाला आकार देणाऱ्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि संचालन विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुदर्शन महाडिक यांनी आभार मानले.