शहर विकासाची व्याख्या काय हो भाऊ…चला तुम्हाला कोल्हापूरचा विकास दावू….!!!
नागरिकांच्या मोठ मोठ्या स्वप्नांना भगदाड, सर्वांगीण विकास गेला दृष्टीआड…!!!
वाहतुकीचा पार इस्कुट, काय फायदा करून एवढा काथ्याकूट..?
जिल्हाधिकारी ऑफिस रोडवर तळे,
महापालिका आयुक्त निवासस्थानासमोर खाचखळगे..!!!
कोल्हापूर, ता. 23 – ( महेश गावडे)
कोल्हापूर शहर आणि परिसरात पडलेल्या खड्यांमुळे नागरिकांची
त्रेधा तिरपीट उडत आहे. खड्डे चुकवताना त्यांना तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. सध्या सुरू असणाऱ्या पावसाळ्यामुळे तर शहर विकासाचे पितळ उघडे पडले असून त्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसाला एकवेळ माफ करता येणाऱ्या चुकांवर पांघरूण घालता येईल. पण पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांवर, दररोज साठल्या जाणाऱ्या कचऱ्यावर, वाहतुकीच्या प्रश्नावर, शहराच्या कोंडवाड्यावर
कोणते पांघरूण घालून ते झाकता येणार, हे प्रश्न कसे सोडवनार हा प्रश्न पडला आहे, असे अनेक प्रश्न पडत आहेत आणि तिकडे सर्वसामान्य माणसाला स्वतच्या विकासाची, शहराच्या प्रगतीची मोठ मोठी स्वप्ने पडत आहेत. पण या स्वप्न यांची पंखे छाटली आहेत, ती पूर्ण होण्यात अस्मानी आणि सुलतानी संकट जणू भिंत बनून उभी आहेत. आता सर्वसामान्य माणसाला ही विकासाची सर्वांगीण स्वप्न पडत असली तरी त्या स्वप्नातही आता रस्त्यावरील खडे, गढूळ पाणी, कचऱ्याचा न होणारा उठाव, अस्ताव्यस्त पार्किंग, पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे पाईप लाइन, ड्रेनेजचे घाण पाणी, चिखल गुठा, नको त्या ठिकाणीं आणि नको तेव्हढे गतिरोधक, कचऱ्याने थुंबलेल्या गटारी हेच चित्र दिसत आहे, असे म्हटले तर ते गैर ठरू नये.
पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक ही खोळंबत आहे. कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाले तर वाहतुकीचा पार इस्कुट झाला आहे.
शहर आणि परिसरात सध्या ठिकठिकाणी मोठ मोठे खडे पडले आहेत. मात्र या खाच खळग्यातून वाट काढत वाहन धारक आणि पादचारी यांना मार्गक्रमण करावे लागत आहे. शिवाजी विद्यापीठ सायबर रोड, सायबर चौक, कावळा नाका, स्टेशन रोड, शाहूपुरी,
परीख पुल, रंकाळा वेश ते गंगावेश, हॉकी स्टेडियम, लक्ष्मीपुरी मधील काही भाग, राजारामपुरीमधील काही गल्या, व्हिनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन परिसर, अयोध्या पार्क समोर रस्ता आदी परिसरात खड्यांचे साम्राज्य दिसत आहे.
जिल्हाधिकारी रोडवर तर २२ जुलै रोजी पडलेल्या पावसाने तळे निर्माण झाले होते. तर महापालिका आयुक्त यांच्या शाहूपुरी येथील निवासस्थानासमोर आणि त्या समोरील रोड खाच खळगे यांनी व्यापलेला आहे, ते यंत्रणेला दिसत नाही का, असा प्रश्न जाणकार नागरिक विचारत आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर खडेयुक्त रस्त्याचे केलेले पॅच work अर्थात
तातपूरती मलमपट्टी कुचकामी ठरली आहे, हे उघड स्पष्ट होऊ लागले आहे.
सध्या पडणाऱ्या पाऊस यांच्यामुळे तर शहर विकासाचे तकलादू चित्र पार उखडून पडले आहे. बहुतांशी ठिकाणी गटारी मधील कचरा रस्त्यावर येत आहे आणि त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
शहर विकासाची व्याख्या काय हो भाऊ, असा कोणी प्रश्न आज विचारला तर त्याचे उत्तर न देता निरुत्तर राहणे कोणीही पसंत करतील, अशी आजची परिस्थिती आहे. कारण कोणाला ही आज शहर विकास आणि समस्येचे काही पडलेले नाही. ना कोणी या विरुद्ध आवाज उठवत आहे ना कोणी आपली समस्या प्रभावीपणे मांडत आहे आणि कोणी आवाज उठवला तर त्याला थातूर माथूर कारण सांगून आणि कधी ही पूर्ण न होणारी आश्वासने देऊन गप्प बसवले जात आहे. कोणी उच्चपदस्थ अधिकारी असो वा उद्योगपती यांना शहर विकासाचे काही देणे घेणे राहिले आहे का, अशी विचारणा आता नागरिकांतून होऊ लागली आहे. शहराचे स्वास्तथ्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने कोणीही कसली ही हालचाल करत नाही, वा उपाय योजना करत नाही,
हे आजच्या घडीचे भयंकर वास्तव आहे. महापालिका प्रशासनाने नाले सफाई केली, ही चांगली बाब आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरात पुर येऊ नये, यासाठी उपाय योजना केली, मात्र तरी ही बऱ्याच गोष्टीकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे आणि ते ते अमान्य करू शकत नाहीत. कचरा उठाव आणि त्याची निर्गतीचा प्रश्न असल्याने हा कचरा नागरिक कुठेही फेकत आहेत, अगदी जयंती नाल्या शेजारी असलेल्या ओढ्यात, रस्त्यावर, गटारीत टाकत आहेत आणि या चुकीच्या गोष्टीला कोणी आळा घालू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. विकास ठप्प असताना नागरिक देखील गप्प आहेत, ते समस्या उघड्या डोळ्यांनी पाहतात, पण मूग गिळून गप्प बसतात. जो तो आपला विकास कसा होईल, ते पाहत आहेत. कोणत्या योजनेचा कसा फायदा मिळेल, यासाठी देखील अनेकजण पाहत आहेत. हे काही चुकीचे नाही.पण स्वतः चा विकास करताना आपल्या गल्लीचां, परिसराचा, शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हायला नको का, याबाबत ते आग्रही राहिलेले दिसत नाहीत, आणि आशा वर्गांची संख्या कदाचित हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत असेल. इथे प्रत्येक घटकाने मला, आपल्याला काय मिळते, याचाच विचार केला तर शहराच्या वाट्याला काय येते, हा देखील जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज आहे. अशा दारून दुरवस्थेमुळे नागरिकांची घे माय धरणी ठाय होत आहे.
समाज हा केवळ कोणत्याही एक वर्गा मुळे किंवा बाबिमुळे मोठा होत नाही. शहर विकासाला सर्वच घटकांचा हातभार लावणे आवश्यक असते. मात्र, लोकपरतिनिधींशिवाय कोणता घटक आपली सामाजिक जबाबदारी उचलतो किंवा स्वीकारतो, हा प्रश्र्न मनात आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूर ही औद्योगिक नगरी आहे. मोठ मोठे उद्योजक, सरकारी अधिकारी, गर्भ श्रीमंत लोकांनी मनात आणले तर शहराचे रुप ते काही दिवसात पालटू शकतात, कारण ते धनवान आहेत. पण जर त्यांनी शहरचा विकास केला तर लोकप्रतीनिधींना काम राहणार नाही, आणि भविष्यात हाच पायंडा पडेल, याची भीती आहे, तर नागरिक ही आपली समस्या घेऊन धनवान लोकांकडे जातील. परिणामी लोकप्रतीनिधीचे महत्व कमी होईल.
पण असे होणे आज तरी अशक्य कोटीतील बाब दिसते आहे. यासाठीच लोक प्रतिनिधी आणि समाजातील जबाबदार घटक यांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून शहर विकासासाठी आज झटण्याची खरी गरज भासते आहे.