दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून कामकाज करत असताना जनावरांच्या उपचारासाठी गोकुळच्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ही हर्बल पशुपूरक उत्पादने गोकुळच्या दूध उत्पादनात वाढ व दुधासह अन्य पदार्थांची गुणवत्ता उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतील. तसेच जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने प्रभावी आहेत. या पशुपरक उत्पादनांचा दुग्ध व्यावसायिकांना निश्चितच फायदा होईल, असे सांगत चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळमार्फत नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
हा कार्यक्रम नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते तर आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख मान्यवर व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, सर्व संचालक यांच्या उपस्थितीत संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी, (ता.करवीर) येथे झाला.
यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, जनावरांच्या पारंपारिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना देणेसाठी गोकुळतर्फे दूध उत्पादकांना खात्रीशीर गुणवत्तेची हर्बल औषधे किफायतशीर दरात उपलब्ध केली आहेत. ही औषधे उत्पादकांना सहज व सुलभ पद्धतीने वापर करता येणार असून ती नैसर्गिक असल्यामुळे जनावरांच्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत. या औषधांमुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास चालना मिळणार आहे.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले की, गोकुळने सुरु केलेल्या हर्बल पशुपूरक उत्पादनांच्या वापरामुळे दूध उत्पादकांचा जनावरांच्या औषध उपचारावरील खर्च कमी होणार असून ही उत्पादने शेतकऱ्यांच्या घरात उपलब्ध असलेल्या व पर्यावरणपूरक सामुग्रीचा वापर करून तयार केली असून त्यांच्या वापरामुळे प्रतिजैवक (अँटिबायोटिक) औषधांचा होणारा अति वापर कमी होऊन प्रतिजैवक (अँटिबायोटिक) अंश विरहित दूध निर्मिती होऊन चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन करून ग्राहकांना देणे शक्य होणार आहे.
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, स्तनदाह (मस्टायटीस) या आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांच्या उपचारासाठी प्रति जनावर अंदाजे रु. १५०० ते २०००/- इतका खर्च येतो. तर या हर्बल पशुपूरक उपचार पद्धतीमुळे तो खर्च कमी होऊन अंदाजे ३०० ते ५०० रु. येणार असून यामध्ये दूध उत्पादकांचे किमान अंदाजे रु. १०००/- बचत होणार असल्याने गोकुळच्या हर्बल पशुपूरक उत्पादनांचा प्रभावीपणे वापर करावा. तसेच मस्टायटीसला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सी.एम.टी.टेस्ट कराव्यात. हर्बल पशुपुरके उत्पादन आणि पुरवठा साखळी सुविधा या योजनेंतर्गत हा प्रकल्प नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, के.डी.सी.सी.बँकचे संचालक ए.वाय.पाटील, भैय्या माने, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, एन.डी.बी,बी.चे प्रतिनिधी डॉ.विजय बाहेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डॉ.विजय मगरे, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.