एक राखी सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थिनींनी सहशिक्षिका उर्मिला तेली यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना शनिवारी, २० जुलैरोजी पोस्टाने राख्या व शुभेच्छा पत्र पाठवले.
देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभिमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षिका उर्मिला तेली यांनी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. चार दिवस राख्या तयार करण्यात आल्या. त्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत.
सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सण-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल, असे मुख्याध्यापक विलास कुंभार म्हणाले. सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळाली. त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याचीही जोपासना झाली, असे विषय शिक्षिका उर्मिला तेली यांनी सांगितले.विशेष म्हणजे शिक्षिका तेली यांचे वडील हे एक सैनिक होते, त्यामुळे त्या दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती वाढावी यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे दिसून येते.
या उपक्रमासाठी शिक्षक डी.ए पाटील,शरद गुरव, स्वप्नाली कलकुटकी यांनी सहकार्य केले.यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विनायक कांबळे, सरपंच रेखा पोवार, डॉ दिलीप माने, शिवाजी पाटील यासह सदस्य उपस्थित होते.