शहराला कोणी आहे का वाली, खड्ड्यांबरोबरच कचऱ्याने शहराची वाट लावली..!
शहरचा विकास गेला उडत, मूलभूत नि पायाभूत सुविधासाठी नागरिक आहेत चाचपडत !!!
गल्लीचा झाला बोळ, विकासामध्ये झाला घोळ !!
कोल्हापूर, ता. १७ – (महेश गावडे)
शहर आणि परिसरातील के एम टी चे बरेच थांबे हे घाणीच्या साम्राज्यात सापडले आहेत. स्टेशन रोडवरील केएमटीचे थांबे हे त्याचे ताजे उदाहरण ठरावे. घाणीच्या आणि दुर्गंधीचा गर्तेत सापडलेल्या या थांब्यांमुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी प्रकट होत आहे. महापालिकेचा हा आंधळा कारभारात कधी सुधारणा होणार असा प्रश्न आता आ वासून उभा आहे, की एसटी प्रमाणे के एम टीने देखील प्रवाशी यांना गृहीत धरले आहे, अशीही खदखद व्यक्त होत आहे.
कोल्हापूर शहर आणि परिसराची सध्या अक्षरशः नाही तर शब्दशः देखील पूरती वाट लागली आहे. खड्यातील रस्ते शोधण्यात नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर अनेकांच्या गाड्यांचे पार्ट सोबत त्यांची हाडेही खिळखिळी होत आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी पडलेल्या खडेमय रस्त्यातून वाहन धारकांना मार्गक्रमण करावे लागत असून याच मार्गावरून जाताना पादचारी यांना जीव मुठीत घेऊन आणि कपडे सांभाळून जावे लागत आहे नाहीतर खडेमय रस्ते मार्गावरून जाणाऱ्या गाड्या जर पाणी साचलेल्या डबक्यातून गेल्या तर त्यांच्यावर दूषित आणि घाण पाण्याचा जलाभिषेक झालाच म्हणून समजा. अशी परिस्थिती ओढवत आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या कचऱ्याने मोठी समस्या निर्माण केली आहे. शहर आणि परिसरात काही ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या आहेत. हे चांगले लक्षण मुळीच नाही. म्हटले तर
बेजबाबदार नागरिक कचरा कुठे ही टाकत आहेत. पण महापालिकेची यंत्रणा तरी हा कचरा एकवटण्यात, उठाव करण्यात कुठे सक्षम आहे, हा प्रश्र्न उपस्थित राहतोय. कचऱ्याच्या निर्गतीकरणाची समस्या निर्माण झाली आहे.
तिकडे तथाकथित नेत्यांकडून
कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधू, करू, असे वारंवार सांगितले जात आहे. महापालिकेवर सध्या प्रशासक आहे, असे असूनही १०० कोटींचा निधी विकास कामांसाठी तरतूद केला आहे, असे सांगितले जात असताना त्यातील १० कोठी देखील खर्ची पडलेले नसल्याचा आरोप जाणकार नागरिकांतून आता होत आहे.
शहराची हद्दवाड रेंगाळली आहे, प्रस्तावित हद्दवाडमधील गावे शहरात येण्यास तयार होईनात, जी महापालिका स्वतः चां विकास करू शकत नाही, ती आमचा कसला विकास करणार, असा ते प्रश्न करत आहेत. कारण कोल्हापूर शहराची झालेली दुरवस्था ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, अनुभवत आहेत.
आता हेच बघा ना, स्टेशन रोडवरील रेल्वे स्टेशन समोरील एक केएमटीचा थांबा अक्षरश: नाही तर शब्दशः घाणीच्या विळख्यात सापडला आहे. याशिवाय व्हिनस कॉर्नर येथील केएमटीचा थांबा देखील घाणीत सापडला आहे. हे दोन थांबे प्रवाशांना जाणवणाऱ्या समस्येचे प्रातिनिधिक उदाहरण ठरावेत. केएमटी स्टॉप चां परिसर आस्वच्छ आहे आणि अशा घाण वातावरणात प्रवाशांनी कचरा, घाणीचा वास घेत गाडीची वाट पाहावी का, ही प्रवाशी यांना एकप्रकारची शिक्षाच नाही का? जर एखादेवेळी एखाद्या प्रवाशिने केएमटी मधून प्रवास करताना चुकून किंवा जाणून बुजून तिकीट काढले नाही तर त्यांना दंड केला जातो, दंडाची वसुली केली जाते. आता निर्माण झालेल्या या
असुविधेबद्दल केएमटीच्या प्रवाशांनाच महापालिका प्रशासनाने दंड म्हणून घेतलेली रक्कम त्यांना अदा करावी, अशी ही मागणी कोल्हापुरातील सुधाकर वझे यांनी केली आहे.
वझे यांनी केलेली ही मागणी अतीशोयक्तीपूर्ण वाटत असली तरी यावरून केएमटीच्या प्रवाशांना जाणवणारी समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येते.
आज कोल्हापूरचे चित्र पाहिले तर या शहराला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्र्न निर्माण होणे स्वभाविक आणि साहजिकच आहे.
शहरात बऱ्याच रस्त्यावर मोठ मोठे खडे पडले आहेत, ते मुजवायला कोणी ही पुढे येत नाही आणि आलेच तर अशा वर्गाची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत आहे. महापालिका प्रशासन आज अस्तित्वात आहे का, अशी प्रश्न विचारला जात आहे की नागरिकांना जाणवणाऱ्या पायाभूत सुविधा बद्दल त्यांचे काही देणे घेणे नसल्यासारखी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलेल तो सुदिन.
शहर आणि परिसरात दुचाकी चार चाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र पार्किंगचे व्यवस्थित नियोजन नाहीये. अशा गाड्या दुतर्फा पार्किंग केल्यामुळे गल्लीचा अक्षरशा बोळ झाला आहे. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचे पाणी तसेच पाईपलाईन फुटून त्याचे पाणी गल्लीबोळात पसरत आहे. हे चित्र विचित्र पाहिले की कोल्हापूर शहराच्या विकासामध्ये कुठेतरी घोळ झाल्याचा संशय नक्कीच बळावतो. शहर विकासाचे अनेक प्रश्न आहेत,
मात्र आज त्याचे उत्तर कोणी देऊच शकत नाही किंवा हे याचे योग्य उत्तर देण्याचं दायित्व आज कोणी जबाबदार घटक घेऊ शकत नसेल तर हे जगात भारी कोल्हापुरी असे अभिमानाने म्हणणाऱ्या नागरिकांचे, कोल्हापूरकर वासियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. याचाच अर्थ असा की, आज शहर आणि परिसरचे प्रश्न अनेक असले तरी त्याचे उत्तर काही एक नाहिये, असाच निष्कर्ष यातून निघत आहे. कारण एखादं शहर, एखाद गाव उत्कर्ष पावत नसेल, त्याची वर्षांनुवर्ष प्रगती होत नसेल तर तेथील सुशेगाद नागरिक तितकेच जबाबदार आहेत. असेही इथे खेदाने म्हणावे लागत आहे.