शासनाच्या विविध सवलती मिळण्यासाठी गोपाळ समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलन
कोल्हापूर, ता. ११ – (समाज धन टाइम्स प्रतिनिधी)
गोपाळ समाजातील लोकांना शासनाच्या विविध योजना मेळाव्यात यासाठी दलित महासेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या समाजाने सहकुटुंब पावसात भिजत हे आंदोलन केले.
दरम्यान या समाजाचे सुमारे १०० मतदार आहेत. मात्र त्यांना कोणत्याही शासकीय योजना लाभ मिळत नाही, तो मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
हातकणंगले तालुक्यातील गोपाळ समाजातील लोक जन्मजात दिव्यांग आहेत. या समाजातील लोकांना विशिष्ट प्रकारचा आजार असल्यामुळे त्यांच्या अंगावरील कातडीचा रंग गोरा असून तो एखाद्या त्वचा रोगासारखा दिसत आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची कामे करता येत नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्या डोळ्यांनाही दिसत नसल्यामुळे त्यांना कोणता व्यवसाय करायचा म्हटला तर तो करता येत नाही. त्यामुळे या समाजातील बहुतांशी लोकांना भीक मागून खाल्ल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यांच्यातील काही लोकांना भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नाही. त्यांच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड अशा कोणताही ठोस पुरावा नाही. तहसीलदार कार्यालय मध्ये कोणत्याही प्रकारची त्यांना दाद मिळत नाही. ही कागदपत्रे आणा, ती कागदपत्रे यांना अशा प्रकारची उत्तरे त्यांना दिली जातात, असा त्यांनी आरोप केला. गोपाळ समाजातील लोकांना शासनाच्या विविध योजना मेळाव्यात जसे की मोफत धान्य, विनाअट जन्माचे दाखले, जातीचे दाखले, घरकुल योजना अशा त्यांच्या मागण्या आहेत.
या आंदोलनात अब्दुल शेख, बिजली जाधव, आकाश जाधव, विशाल जाधव, रेश्मा शेख आदींनी भाग घेतला.
दरम्यान, या समाजातील समाज बांधवांनी सांगितलं की, आम्ही पेठवडगाव येथे सुमारे 100 जण तसेच कराडमध्ये दीडशे जण राहतो. आमचे घर हे मातीचे पडकं आहे. आमच्या शरीराच्या रंगामुळे आम्हाला कुठे कामच मिळत नाही. डोळ्यांना कमी दिसत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आमची आणि आमच्या अगोदरची पिढी देखील काम आणि काम मिळवण्याच्या शोधातच राहिली. पण त्यांच्या हाताला काम मिळाले नाही. ना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ. आता तरी आमच्या येणाऱ्या पिढीला आणि सध्याच्या पिढीला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा ही आमची शासन आणि प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे. आमच्यापैकी काहींचे मतदान ही आहे. आम्ही मतदानही करतो. मात्र आमच्या मागण्या या अजून मागण्याच राहिल्या आहेत, अशी खंत त्यांनी समाज धन टाइम्सशी बोलून दाखवली