विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांचा पत्रकार परिषदेत इशारा
संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे केले आवाहन
कोल्हापूर, ता..१० – (प्रतिनिधी) विशाळ गडावरील अतिक्रमण यादीत आणि याबाबत कोर्टात गेलेल्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही लोकांचा समावेश आहे. हा धार्मिक विषय मुळीच नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन तेथील अतिक्रमण नाही काढली तर वफ्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत, त्या जागांवर मंदिरे बांधण्यास सुरुवात करू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
याबाबत अधिक माहिती त्यांनी देताना सांगितले की, विश्व हिंदू परिषद गेल्या अनेक वर्षांपासून विशाळ गडावरील अतिक्रमण प्रश्र्नी लढा देत आहे. बहुसंख्य हिंदू बांधव या विषयावर आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासन यांनी घीतलेली नाही. तर छत्रपती संभाजी राजे यांनी या विषयावर वेगळा प्रकार हाती घेतला असून त्यांनी तो थांबवावा. वास्तविक राज्यातील विविध गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे. त्यांनी त्याचे नेतृत्व करावे, त्यांनी तसे नेतृत्व केले तर त्याला समस्त शिवप्रेमी, गड प्रेमी आणि सकल हिंदू समाज पाठिंबा देतील. पण त्याला संभाजीराजेंनी विक्षिप्त सवरुप देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. तसेच गडावरील अतिक्रमण प्रशनी आपण काय प्रयत्न केले, याची सविस्तर माहिती दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना
कुंदन पाटील म्हणाले, विशाळ गडावरील प्रश्नावरून संभाजीराजे राजकारण करत आहेत का असा प्रश्न निश्चितच मनात येत आहे. या साठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मुळात
संभाजीराजे हे रायगड प्रधिकरनचे अध्यक्ष होते, खासदार होते, त्यावेळी त्यांनी अशा कोणत्याही आंदोलनात किंवा कारवाईत सहभाग घेतल्याचे आपल्या माहितीत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, विशाळ गडावरील अतिक्रमण प्रशासन यांनी वेळीच जागे होऊन काढावीत नाहीतर कोल्हापूरमध्ये वफ्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत, त्या जागांवर मंदिरे उभारण्यात येतील. तसेच विशाळ गडावरील अतिक्रमणबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, नाहीतर पन्हाळगडावर फार्म हाउस बांधण्यासाठी जागा रेखांकन करण्यास प्रारंभ करू, असा ही इशारा कुंदन पाटील यांनी यावेळी दिला. विशाळ गडावर ज्यांनी अतिक्रमण केले, त्यांना तुम्ही हलऊ शकत नाही, तर उद्या आम्ही ही याचा किता गिरवू, जो न्याय तुम्ही त्यांना देत आहात, तोच न्याय उद्या आम्हाला ही प्रशासन यांनी द्यावा, असेही श्री. पाटील यांनी बोलून दाखवले..
या पत्रकार परिषदेला
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदू महासेभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सर्वश्री प्रमोद सावंत, अभिजित पाटील, राजू तोरस्कर, योगेश केरकर, सोहम कुराडे, सनी पेणकर, आनंद कवडे, विकी भोगम, केदार मुनीश्वर, ऐश्वर्या मुनीश्वर उपस्थित होते.