कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत विविध विकासात्मक विषयावर नेत्यांनी केली चर्चा
जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी चोख नियोजन करा-पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
मार्च 2024 अखेर 598.67 कोटींच्या झालेल्या खर्चाला मान्यता
सन 2024-25 साठी अर्थसंकल्पित 695.67 कोटी रुपयांपैकी प्राप्त 229.42 कोटी रुपयांच्या तरतुदीचा आढावा
जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देवू
जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2024- 25 या आर्थिक वर्षात शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी चोख नियोजन करा, तसेच आवश्यक त्या प्रशासकिय मान्यता लवकरात लवकर द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ता. ६ रोजी केल्या. यावेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मार्च 2024 अखेर 598.67 कोटींच्या झालेल्या खर्चाला समितीने मान्यता दिली. तसेच सन 2024-25 साठी अर्थसंकल्पित 695.67 कोटी रुपयांपैकी प्राप्त 229.42 कोटी रुपयांच्या तरतुदीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे काम रद्द करावे, असा ठराव यावेळी बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात घेण्यात आली. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबीटकर, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, जयश्री जाधव, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच समिती सदस्य व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सुरुवातीला आमदार पी.एन.पाटील यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी नवनियुक्त खासदार शाहू महाराज छत्रपती व धैर्यशील माने यांना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे काम रद्द करावे, असा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मोठ्या ग्रामपंचायतींना 15 लाख व छोट्या ग्रामपंचायतींना 10 लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केल्याबद्दल सदस्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळांच्या इमारतींचे बांधकाम, येथील स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्याबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करा. वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा, परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी नुतनीकरणाची कार्यवाही जलद करा, असे सांगून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या कामांचा व चालू वर्षात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.
प्राथमिक शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, पंचगंगा प्रदुषण नियंत्रण आदी कामांबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशा सूचना पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी उपस्थित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्ह्यातील रस्ते, विमानसेवा सुरळीत होत आहेत. पर्यटन स्थळांना व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी पर्यटक व भाविकांची संख्या वाढत आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व पुर परिस्थितीवर उपाय म्हणून बास्केट ब्रीज लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्यावर बास्केट ब्रीजचे कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरात लवकर बैठक आयोजित करुन हे काम गतीने मार्गी लावावे, अशी सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केली.
खासदार धैर्यशील माने यांनी जिल्ह्यात वनविभागातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल व्हावा, असे सांगितले.
जुन्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा आमदार प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केली. इचलकरंजी शहरातील पाण्याच्या टाक्यांचे काम गतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. रंकाळा तलाव प्रदुषण मुक्त होण्यासठी प्रयत्न व्हावेत, असे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारीत शाळा व्हावी, अशी अपेक्षा आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. पंचगंगा नदीत गावांमधून मिसळणारे सांडपाणी थांबण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्राच्या एसटीपी प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर अडीच वर्षांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. बास्केट ब्रीजचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी तसेच विभागीय क्रीडा संकुलाचे काम व जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संबंधित प्रलंबित विषय गतीने पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यात शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येईल.
शाळांना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी निधीची तरतूद करावी. जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांमुळे खोदकाम झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी. पंचगंगा नदीचे प्रदूषण राखावे, परिख पुलाचे नूतनीकरण लवकरात करुन वाहतूक कोंडी टाळावी, ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधीची तरतूद व्हावी, रस्ते, इमारती, शाळा, आरोग्य केंद्रांच्या इमारती दुरुस्ती व्हावी आदी सूचना सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी केल्या.
जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी सादरीकरणातून मागील वर्षी झालेला खर्च व चालू वर्षात करण्यात आलेल्या तरतुदीची माहिती दिली.
जिल्हा वार्षिक योजना माहे मार्च 2024 अखेर झालेला खर्च याप्रमाणे आहे –
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 480 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 117 कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत 1.67 कोटी
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 मध्ये 480 कोटी रुपये मंजूर नियतव्ययाची राज्यस्तर व जिल्हा परिषद स्तर तरतूदीची माहिती-
राज्य स्तरीय यंत्रणा 325.99 कोटी रुपये, जिल्हा परिषद स्तरीय यंत्रणा 154.01 कोटी रुपये असे एकूण 480 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली होती.
सन 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 576 कोटी रुपये अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 118 कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत 1.67 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे.
क’ वर्ग यात्रास्थळ मान्यता –
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या जिल्ह्यातील 1 लाखावरील भाविक भेट देत असलेल्या यात्रा स्थळांना “क” वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील हजरत गैबी पीर दर्गा व भेंडवडे गावातील श्री खंडोबा देवालय व गैबी पीर दर्गा, पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी माळवाडी गावातील श्री विठठल रुखमाई मंदिर, पडळ गावातील श्री रामेश्वर मंदिर व पिंपळे तर्फ ठाणे गावातील श्री हनुमान मंदिर, आजरा तालुक्यातील मडीलगे गावातील श्री रामलिंग मंदिर देवालय, राधानगरी तालुक्यातील कौलव गावातील श्री मारुती देवालय, कुडूत्री गावातील श्री कल्लेश्वर मंदिर, तरसंबळे गावातील श्री जोतिर्लिंग मंदिर, भुदरगड तालुक्यातील आकुडे गावातील श्री महादेव मंदिर, करवीर तालुक्यातील जैताळ गावातील श्री हनुमान मंदिर, गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नुल गावातील श्री सुरगीश्वर मंदिराचा समावेश आहे.
क’ वर्ग पर्यटन स्थळ मान्यता -* जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांनी सादर केलेल्या शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण परिसर या पर्यटन स्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले.