सायबर चौकातील अपघात- दौलत नगर येथील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हृदयद्रावक
पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर, आता दुःख यातनाच सोसाव्या लागणार ढीगभर…
हर्षद आणि प्रथमेशच्या जाण्याने पाटील कुटुंबीय सैरभर, नियतीच महागात पडलं वैर
समाजाने पाटील कुटुंब यांना कठीण काळात आधार द्यावा समाजमन बहुउद्देशीय संस्थेची अपेक्षा
कोल्हापूर, दिनांक. ४ – (महेेेश गावडेेेे)
या जीवनात जितकं सुख आहे, त्याहून अधिक दुःख देखील भरून राहील आहे. आपल्या समोर केवळ सुखी जीवनाचं चित्र उभ राहत. कारण कोणालाही दुःख, वेदना, यातना, त्रास, विरह, दुखाष्रू नको असतात. पण कोणाच्या जीवाचा तुकडा जेव्हा या जगातून कायमचा निघून जातो तेव्हा मात्र हे जग, जीवन आणि जीव नको नकोसा वाटतो. घर नुसत खायला उठतं,
आपल्याला सोडून अनंत्तात विलीन झालेल्या आपल्या प्रिय आणि लाडक्या सदस्यांची पदोपदी जाणवणारी उणीव काळीज चिरून टाकणारी असते.
3 जून रोजी सायबर चौक येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांना आपला प्राण गमवावा लागला. यातील दोन मुले दौलत नगर येथील आहेत. प्रथमेश पाटील आणि हर्षद पाटील अशी त्यांची नावे आहेत. ते दोन सखे भाऊ आहेत. बुधवारी
समाजमन बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष महेश गावडे यांनी त्यांचे वडील सचिन पाटील यांची दौलत नगर येथील घरी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सचिन पाटील यांना आपल्या दोन मुलांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने मोठा मानसिक धक्का बसल्याचे दिसून आले.
यावेळी दोन्ही मुलांच्या आठवणीने त्यांचा जीव अक्षरशः व्याकूळ झाला.
त्यांच्या सांत्वनासाठी त्यांचे मित्रमंडळी, पै पाहुणे घरी येत, जात होते. त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत होते.
सचिन पाटील यांचे वडील शाहू मिल मध्ये कामाला होते. त्यांचे मूळ गाव गगनबावडा येथील कोदे हे आहे. सचिन पाटील यांचा जन्म मात्र कोल्हापुरात झाला. संसाराच्या वेलीवर त्यांची दोन फुले फुलली होती. सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र नियतीच्या मनात काही औरच होते.
प्रथमेश आणि हर्षद दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गाडीवरून राजाराम तलावाकडे पोहण्यासाठी म्हणून निघाले. मात्र, सायबर कॉलेजच्या दिशेने जात असताना त्यांनी मध्येच आपला मार्ग बदलला आणि ते पर्यायी मार्गाने तिकडे जाण्यास निघाले होते, तितक्यात सायबर चौकात ते आले असता आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला. यात सचिन पाटील यांची हाता तोंडाशी आलेली दोन्ही मुले मृत्युमुखी पडली.
आपल्या मुलांच्या निधनाची वार्ता समजतात सचिन पाटील आणि त्यांच्या सौ. पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली.
खरे तर त्या दिवशी सचिन पाटील रिलायन्स मॉल मधून दुपारी घरी जेवण करण्यासाठी आले होते. घरात सर्वांनी मिळून एकत्र जेवून घेतले. यावेळी प्रथमेशने त्याच्या मोबाईलचा डिस्प्ले गेला असल्याने तो बदलूया चला, असे आपल्या वडिलांना सांगितले. मात्र वडिलांना कामावर जायचं असल्यामुळे त्यांनी प्रथमेशला संध्याकाळी आपण तुझ्या मोबाईलचा डिस्प्ले बदलू असे सांगितले. पण प्रथमेश आणि हर्षदची घराबाहेर पडण्याची वेळ वाईट ठरली.
प्रथमेश वय 19 हा कॉमर्स कॉलेज येथे बारावी मध्ये शिक्षण घेत होता. त्याला 62 टक्के मार्क पडले होते तर हर्षद वय 16 हा तवणापा पाटणे शाळेमध्ये दहावी मध्ये शिकत होता, त्याला 67% पडले होते. हर्षद ला नोकरीपेक्षा व्यवसाय,धंदा करायची इच्छा होती. तसे त्याने वडिलांना बोलूनही दाखवले होते. तर प्रथमेश हा हाडाचा कलाकार होता. त्याला इयत्ता पाचवीपासूनच चित्रकलेची आवड होती. त्याने शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये चित्रकलेमध्ये काही बक्षीस मिळवली होती.
प्रथमेश रांगोळी ही फार छान काढत असे.
आसपासच्या परिसरामध्ये विविध कार्यक्रमा निमित्त त्याला रांगोळी काढण्यासाठी बोलावले जात असे. प्रथमेशला ग्रॅज्युएशन नंतर कलानिकेतन मध्ये प्रवेश घ्यायचा होता. मात्र त्याचे स्वप्न हे अखेर स्वप्न राहिले. धाकटा मुलगा हर्षदवर वडिलांचा तर प्रथमेशवर तिच्या आईचा अधिक जीव होता.
प्रथमेशला त्यांचे पालक प्रेमाने चिनू म्हणायचे आणि हर्षदला हर्षु म्हणायचे.
सचिन पाटील यांचा सुखी संसार सुरू होता.
त्यांच्या संसाराच्या वेलीवर फुललेली दोन फुले वेळेआधीच पार कोमेजून गेलीत. त्यांची ही दोन मुलं म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं… त्यांचे विश्व होतं… त्यांचं हे विश्वच आता हरपलेल आहे.
हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करून तसेच प्रेमाचे सिंचन करून उमलेली ही दोन नजाकतदार फुलं खुडून गेली आहेत.
सचिन पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. पाटील यांच्या अंगात आता आलेल्या परिस्थितीशी लढण्याच बळ उरलेल नाही. त्यांचं कोणीही कितीही सांत्वन केले तरी त्यांच्या जीवनातील मुलांची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही, आणि हे अंतिम सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
आयुष्यभर पाटील कुटुंबियांनी जे कमावलं होतं ते सारं आता त्यांनी गमावलेल आहे. आई वडील आणि त्यांची मुलं हे एकमेकांचा आधार असतात. लहानपणी आई, वडील हे मुलांचा आणि म्हातारपणी मुले ही पालकांचा आधार असतात. पाटील कुटुंबियांचा हा आधार आता नाहीसा झाला आहे. हर्षद आणि प्रथमेश यांच त्यांच्या जीवनातील यश, त्यांची उपलब्धि, पुढे जाऊन सुखाने चालणारा त्यांचा संसार, त्यांचा आनंद, त्यांचं प्रेम, त्यांची माया या साऱ्या साऱ्या गोष्टीना ते मुकले आहेत.
आता सचिन पाटील आणि सौ. पाटील यांची जगण्यावरील इच्छा मरून गेली आहे. त्यांनी आता जगायचं तर कोणासाठी आणि उतारवयात आपल्याला कोण सांभाळेल यासाठी आशाळभूत भूत नजरेने बघायचं तर कोणाकडे, या विचारांचं काहूर त्यांच्या काळजाला
भेदून जात आहे.त्यांच्या प्राणप्रिय मुलाशिवाय त्यांचं अस्तित्व नसल्यास जमा आहे. त्यांच्यावर कोसळलेलं संकट आसमानीच नाही तर सुलतानी देखील आहे.
त्यांच्या मुलांच्या अशा जाण्यान त्यांना झालेलं अतिव दुःख, वेदना, यातना कसल्याही प्रकारच्या परतफेडीन भरून निघणार नाही. जीवनातील त्यांच्या या अत्यंत कठीण समयी आपण, आपला समाज फक्त पाटील कुटुंब यांना आधारच देऊ शकतो, त्यांचं सांत्वन करू शकतो.
हर्षद आणि प्रथमेश यांच्या आठवणी त्यांचे आई, वडील कधीही विसरू शकत नाहीत. त्यांना आता आई आणि पप्पा अशी हाक कोण मारणार आणि त्यांचे आई-वडील चिनु आणि हर्षु अशी हाक आता कोणाला मारणार, या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही ते आज तरी कोणी देऊ शकणार नाही.
आपल्या मुलांच्या विरहाने या माऊलींचा जीव कासावीस होणार आहे. त्यांची घरातील अस्तित्वहीनता त्यांना जबर धका देणार ठरणार आहे. त्यांची आठवण सतत त्यांना सतावणार आहे, डोळ्यात दुःख अश्रू आणणार आहे. त्यांचं जीवन निरर्थक बनवणार आहे .. त्यांच्या असंख्य गोड आठवणी यांचा खजिना मनात दाटून आला की, पहिल्यांदा त्यांच्या संगतीन हवहवस असं वाटणारे जीवन त्यांच्या अनुपस्थितीने आता नको नको वाटणार आहे…..घर मोकळं मोकळं वाटणार आहे…कुठच मन लागणार नाही… दोन मोठे आघात त्यांनी पचवायचे तरी कसे… त्यांच्या शिवाय हे उर्वरित जीवन जगायाच तरी कसे… हाच आणि हाच प्रश्न आज त्यांच्यासमोर आहे आणि या प्रश्नाला बगल देऊन त्यांना जगता येणार नाही. यातून त्यांनाच मार्ग काढावा लागेल, हेही तितकंच खरं आहे.
आपल्याकडून जे शक्य आहे ते आपण पाटील कुटुंबियांसाठी करूया,
त्यांच्या दुःखात सहभागी होऊया, त्यांचं दुःख हलकं करूया, त्यांना जीवन जगायला पुन्हा उभारी देऊया, या अवघड वळणावर त्यांना साथ देऊया, त्यांना आधार देऊया, त्यांच्या वेदना समजून घेऊया, त्यांची त्यांच्या मुलावर माया किती
ओसंडून वाहत होती, त्याची एकदा तरी कल्पना करून पाहूया, त्यांच्या जागी काही क्षण का असेना आपल्याला ठेवून पाहूया, त्यांचं दुःख थोडं आपणही अनुभउया,
इतकच आवाहन समाजमन बहुउद्देशीय संस्थेला यानिमित्तान करायचं आहे.