तृतीयपंथीयांचे कल्याणकारी महामंडळ कागदावर, उच्च शिक्षणासाठीही तृतीयपंथीय होतात भिक्षुक अन् सेक्स वर्कर!
तृतीय पंथीयांमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा वाढतोय टक्का
कोल्हापूर : (महेश गावडे)
तृतीयपंथीय हे केवळ भिक मागून जगू शकतात किंवा सेक्स वर्करचे काम करून उदर निर्वाह करू शकतात, असा सर्वसाधारण समाजाचा समज असतो. या समजामध्ये आजही बदल झालेला नाही असे खेदाने म्हणावे लागते.
मात्र, तृतीयपंथीय हे काही ढगातून अचानक पडलेले नाहीत. त्यांची उपज याच निकोप समाजातून झालेली आहे.मग त्यांना आणि त्यांच्या जन्माला दूषण देऊन काय होणार आहे, हा प्रश्न आहे.
ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना सुखाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे या वर्गालाही तितकाच अधिकार आहे. हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मात्र तृतीयपंथीय यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आज बदलत चालला आहे असे वाटत असले तरी अजूनही त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकारांसाठी विविध पातळीवर झगडावे लागत आहे, लढा द्यावा लागत आहे, प्रसंगी कधी शरीराचा सौदा करून (सेक्स वर्कर चे काम करून) आणि कधी
भीक मागून त्यांना जीवन कंठावे लागत आहे.बऱ्याच वेळा भीक मागून जगताना त्यांना येणारा अनुभव वाईट असतो. पण हा कटू अनुभव रीचउन आणि पचउन त्यांना मार्गक्रमण करावे लागते. त्यात त्यांच्या मनाची होणारी घुसमट आणि घालमेल याचा कोणी विचार करत असेल का, हा संशोधनाचा विषय आहे.
महाराष्ट्र राज्याने तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. त्यांच्या कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र गेल्या साडेचार वर्षांमध्ये त्यांच्यावर एक रुपयाचाही निधी खर्ची पडलेला नाही, तर गेल्या तीन महिन्यांपासून बैठक होऊ शकलेली नाही, अशी खंत तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनेची आहे. मिळालेल्या माहितनुसार शासनाने 2024 धोरणानुसार तृतीयपंथीयांसाठी विशेष कमिटीची स्थापना केली आहे. मात्र या कमिटीचे कामकाज कसे चालते, या कमिटीवर कोण कोण आहेत, याची साधी माहिती अद्याप तृतीय पंथीयांना, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनेला नाही, अशी माहिती कोल्हापुरातील समाजमन संस्थेला मिळाली आहे. थोडक्यात तृतीयपंथीयांसाठी निर्माण झालेले कल्याणकारी मंडळ केवळ कागदावर अस्तित्वात आहे, मात्र त्याचे कामकाज आणि त्यांच्या साठी आखलेल्या धोरणाची वा कायद्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही, याला कोल्हापूर मधील मैत्री संघटनेचे मयुरी आळवेकर आणि सायबर कॉलेजमधील समाजकार्य विभागाचे माजी प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी दुजोरा दिला आहे.
तृतीयपंथीयांनाही संविधानाने सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगण्याचा मानव अधिकार दिला आहे. तृतीयपंथीय यांच्यामध्ये आज उच्च शिक्षण घेऊन यशाची पायरी चढलेले काही वकील आहेत, न्यायाधीश आहेत, शिक्षिका आहेत, डॉक्टर आहेत. अलीकडच्या काळात तृतीयपंथीय देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपणही कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून देत आहेत. त्यांच्यामध्ये उच शिक्षण घेण्याचा टक्का वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच या वर्गाची आता शिक्षण घेण्याची आणि त्यातून आत्म् निर्भर होण्याची भूक वाढत चालली आहे. तृतीयपंथीयांच्या आजच्या युवा पिढीला भीक मागून पोट भरन्याचे काम आवडत नाही. सेक्स वर्करचे काम देखील करण्यास ते मनापासून इच्छुक नसतात. मात्र आर्थिक परिस्थितीच्या अभावी त्यांना असे मार्ग पत्करावा लागतात. त्या शिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर नसतो. कोल्हापूर मधील एक तृतीयपंथीय अक्षरशा भीक मागून आज उच्च शिक्षण घेत असल्याचे मैत्री संघटनेच्या मयुरी आळवेकर यांनी सांगितले. त्याचवेळी जर शासनाने स्थापन केलेले कल्याणकारी मंडळ कार्यरत असते किंवा शासनाने त्यांच्यासाठी आखलेल्या धोरणाची आज प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असती तर अशा काही तृतीयपंथीयांना भीक मागून किंवा सेक्स वर्करचे काम करून शिक्षण घेण्याची कदाचित वेळ आली नसती. याचसाठी कल्याणकारी मंडळाचे कामकाज केवळ कागदोपत्री अस्तित्वात येऊन उपयोग नाही तर त्याची खरोखरच अंमलबजावणी करण्याची आज खरी गरज आहे. राज्यकर्त्यांनी तृतीयपंथीयांसाठी विविध घोषणा केल्या, आश्वासने दिली. मात्र आतापर्यंत कोणत्याही घोषणांची व आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर मधील आळवेकर ह्या देखील या राज्य मंडळावर सदस्य आहेत. तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या महामंडळाची स्थापना झाली. मध्यंतरी या मंडळाची पुनर्स्थापना स्थापना झाली. मात्र गेल्या साडेचार वर्षात केवळ काही ऑनलाईन बैठका झाल्या. असे असले तरी प्रत्यक्षात बैठक होऊ शकली नाही, त्यामुळे या मंडळाचे कामकाज पुढे जाऊ शकलेले नाही वा तृतीयपंथीयांसाठी असणाऱ्या कोणत्याही कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होऊ शकली नाही, अशी तक्रार आहे.
मयुरी आळवेकर यांनी सांगितले की, 2024 च्या धोरणामध्ये शासनाने तृतीयपंथीयांसाठी विशेष कमिटीची स्थापना केली. मात्र या कमिटीवर कोणाकोणाची नियुक्ती केली आहे, कमिटीचे काय काम चालते, कोणत्या पॉलिसी राबवल्या जातात, आमची मते किंवा समस्या मांडणारे राज्याच्या कमिटीवर कोण आहेत, याची काहीच माहिती आपल्याला मिळत नाही.
इतकेच नव्हे तर तृतीय पंथीयांसाठी किती निधी मंजूर केला आहे, किती निधी आमच्यापर्यंत आला आहे, याचीही काहीच माहिती मिळत नसल्याचे आळवेकर यांनी बोलताना स्पष्ट केले.
तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. मात्र राज्य महामंडळाला ऑफिस साठी मुबईमध्ये अद्याप जागा मिळू शकली नाही.
जर एखाद्या वेळी राज्याची बैठक निश्चित केली तर सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी बैठकीसाठी येणार असतील तर त्यांची बैठक कुठे होणार हा प्रश्न आहे. यासाठी या राज्य महामंडळाला कायमस्वरूपी मुंबईत ऑफिस देण्याची गरज आहे. राज्याबरोबरच जिल्ह्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ऑफिस हैं असायलाच हवे. कोल्हापूरचे उदाहरण येथे ताजे आहे.
मैत्री संघटनेने तीन महिन्यापूर्वी महापालिका प्रशासकांकडे प्रशासनाने यापूर्वी दिलेली जागा कमी पडत असल्यामुळे अजून एक गाळा देण्याची विनंती केली आहे. मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याचे आळवेकर यांनी सांगितले.
….
तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी
कोल्हापूर शहर आणि परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मैत्री संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे तृतीयपंथीयांसाठी धार्मिकस्थळी आणि गर्दी असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालय बांधण्याची मागणी केली होती. मात्र जागेच्या अभावाचे कारण सांगून या मागणीची पूर्तता होऊ शकली नाही. त्यांची ही अडचण विचारात घेऊन त्यांच्यासाठी किमान दोन शौचालयाची व्यवस्था व्हायला हवी अशी मागणी आळवेकर यांनी दिली.
…
मैत्री संघटनेच्या मागण्याबाबत लक्ष वेधून घेणारं…
तृतीयपंथीयांना नोकरी आणि शिक्षणामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे.
महापालिकेने इचलकरंजी नगरपालिकेप्रमाणे तृतीयपंथीयांसाठी काही टक्के राखीव निधीची तरतूद करावी, घरकुल योजना असावी,
बचत गटांना अनुदान मिळावे, उद्योग सुरू करण्या साठी काही भांडवल मिळावे, गाय रान मधील जागा मिळावी, कमीत कमी कागदपत्रे सादर करून समाजाला योजना द्यावी
या आणि इतर मागण्यांचां समावेश आहे.