सावर्डे दुमालासह परिसरात
वळवाच्या पावसाने घराची कौले, पत्रे उडाले
सोनाळी, ता. १ : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मंगळवारी दुपारी आलेल्या वळवाच्या पावसाने सावर्डे दुमालासह परिसरातील अनेक घराची कौले, पत्रे उडाले. शिरोली दुमाला, सडोली, मांडरे, चाफोडी, गर्जन, आरळे आदी परिसरात जवळपास तासभर गारांसह जोराचा पाऊस झाला. ऊस पिकासाठी पाऊस पोषक असला तरी पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वार्यामुळे मका, सूर्यफूल, जोंधळा पिके आडवी झाली. काही ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अचानक आलेल्या पावसाने वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले. बाहेर घातलेली वाळवणे, तसेच सरपण झाकण्यासाठी महिलावर्गाची तारांबळ उडाली.
सावर्डे दुमाला येथील पांडुरंग निकम, शंकर निकम, भगवान निकम, मारुती निकम, दगडू निकम, सागर कारंडे, अशोक कदम, प्रकाश कदम, अर्जुना पाडळकर, रघुनाथ पाडळकर यांच्या घराचे पत्रे, कौले उडून लाखो रुपयाचे नुकसान झाले.