कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली श्री.क्षीरसागर यांची भेट
कोल्हापूर दि.१४ : (प्रतिनिधी)
कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे खोळंबा आकार व एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत होती. परंतु, सन २००९ पासून या विषयी आपण लक्ष घातले आणि खरोखरच एस.टी भाडे आणि खोळंबा आकार कमी करण्यात यशस्वी ठरलो. सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर व्हावी यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून, आगामी मार्गशीष पौर्णिमा आणि चैत्र्य पौर्णिमा यात्रेसाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसचा खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली काढू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. डिसेंबर महिन्यात पार पडणाऱ्या सौंदत्ती यात्रेच्या पार्श्वभूमीवर एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारासंदर्भात कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या शिष्टमंडळाने श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून मागणीचे निवदेन सादर केले.
यावेळी बोलताना रेणुका भक्त संघटनेचे श्री.अशोकराव जाधव यांनी, गेल्या सात- आठ वर्षात आपल्या पाठपुराव्यामुळे रेणुका भक्तांची सौंदत्ती यात्रा समाधानकारक होत आहे. आपल्यामुळे एस.टी.चे किलोमीटर दर व खोळंबा आकार कमी झाल्यामुळे सर्व सामान्य रेणुका भक्तांचा आर्थिक भार कमी झाला आहे. चालू वर्षी डिसेंबर २०२४ व फेब्रुवारी २०२५ ला होणाऱ्या सौंदत्ती यात्रेस आरक्षित होणाऱ्या एस.टी.बस वरील खोळंबा आकार रद्द व्हावा व होणारे प्रवासी किलो मीटरचे भाडे कमीत कमी करून रेणुका भक्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
यावर बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, यात्रेकरिता गेली ३० वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत गेल्या नऊ वर्षात केलेल्या पाठपुराव्यामुळे गतवर्षी एस.टी. महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी एकवेळची खासबाब म्हणून प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रती कि.मी.रुपये ५५/- प्रमाणे भाडे दर आकारणी व खोळंबा आकार रुपये १०/- प्रती तास बस आकारण्यास मंजुरी दिली होती. हा खोळंबा आकार पूर्णपणे रद्द व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असून, खोळंबा आकाराचा प्रश्न लवकरच निकाली काढू अशी ग्वाही दिली.
यावेळी तात्काळ श्री.राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रकांना भाडे दर आणि खोळंबा आकारासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून खोळंबा आकारावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करू अशी ग्वाही रेणुका भक्त संघटनेच्या शिष्ठमंडळास दिली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अशोकराव जाधव, सरदार जाधव, दयानंद घबाडे, गजानन विभूते, सतीश डावरे, चेतन पवळ, श्रीमती शालिनी सरनाईक, प्रसन्न शिंदे आदी उपस्थित होते.