राज्यातील भगिनींना आनंद देणारी योजना लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त घोषणा केली नाही तर त्याची अंमलबजावणी करून दाखवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्यामुळे आज भगिनींचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. राज्याने अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण राज्याच्या इतिहासात अशी योजना राबविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री आहे. त्यामुळे राज्यातील माता- भगिनींचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
भारतीय संस्कृतीमध्ये सण, समारंभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण, समारंभांच्या माध्यमातून नाती, कुटुंबाविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आपण व्यक्त करतो. श्रावण महिन्यात येणारे सण हीच नाती दृढ करणारे असतात. समाजात चैतन्य येते. आनंदाची देवाणघेवाण करणाऱ्या या संस्कृतीचे पाईक होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांचा कुटुंब म्हणून विचार केला आहे. त्यामुळेच यंदाच्या राखीपौर्णिमेपूर्वीच राज्यातील समस्त भगिनींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत माहेरची ओवाळणी देण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापुरातील भगिनींच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी राखी बांधण्यासाठी सकाळीच शिवसेना जिल्हा कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी उपस्थित भगिनींनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनाही राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, बहीण-भावाच्या नात्याचे बंध जपणारा राखीपौर्णिमेचा सण यंदा राज्यातील अनेक महिला भगिनींसाठी आनंद घेऊन आला. माझ्या भगिनींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेवर विरोधक टीका करत आहेत पण टीकेशिवाय त्यांच्याकडे दुसरे काम शिल्लक नाही. पुढच्या काळातही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याचे पहावयास मिळेल.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, आदी उपस्थित होते.