अतिवृष्टी मुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे. अतिवृष्टीचा पूर्वानुभव प्रशासनाकडे असतानाही प्रशासन रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत करत आहे काय? असा सवाल करत नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिला. यासह दोन दिवसात शहर खड्डेमुक्त करण्याचा अल्टिमेटम ही क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे चाळण झाली आहे. जीवघेण्या खड्ड्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी राजेश क्षीरसागर यांना प्राप्त झाल्या. त्यानुसार तात्काळ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्यासह महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत शहरातील रस्त्यांची पाहणी केली.
यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देताना राजेश क्षीरसागर यांनी, लोकांचे जीव जाण्यापर्यंत रस्त्यावरील खड्यांवर महापालिका प्रशासन उपाययोजना करत नाही, महापालिकेचे विभागीय कार्यालयांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. रस्त्यावरील खड्डे यामुळे राज्यात कोल्हापूरची बदनामी होत आहे. हा भोंगळ कारभार तात्काळ सुधारावा. शहरातील धोकादायक खड्डे दोन दिवसात मुजवा, अन्यथा गय केली जाणार नाही, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिले.
ते पुढे म्हणाले कि, सद्या पावसाचा जोर ओसरला असून, ज्या ठिकाणी अजूनही चिखल, दलदलीची परस्थिती आहे त्या ठिकाणी मुरूमाद्वारे खड्डे बुजविण्यात यावेत. शक्य असेल त्या सर्व ठिकाणी सिमेंट व डांबरीकरणाचे पॅचवर्क करून शहरवासियांना खड्ड्यांच्या जीवघेण्या त्रासातून मुक्ती द्यावी, अशा सूचनाही यावेळी दिल्या.
यावेळी महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, उपायुक्त राहुल रोकडे, शहरअभियंता नेत्रदिप सरनोबत आदी उपस्थित होते.