ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांच्या घरी जाऊन केले कुटुंबियांचे अभिनंदन
कोल्हापूर ता.०३: (प्रतिनिधी ,)
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक गेम्समधील नेमबाजीत कांस्य पदक पटकावल्याबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांनी कांबळवाडी येथील त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे अभिनंदन केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, पॅरिस ऑलिम्पिकमधील नेमबाजीमध्ये स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक मिळवून तालुका, जिल्हा, राज्य तसेच देशाचा नावलौकिक केला असून त्याचा गोकुळ परिवाराला अभिमान आहे. गोकुळने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले असून स्वप्निलच्या या यशाबद्दल त्याला गोकुळमार्फत १ लाख रुपये बक्षीस म्हणून जाहीर केले व तो कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याचा व कुटुंबियांचा गोकुळमार्फत यथोचित सत्कार करून धनादेश प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले व याबाबतचे निमंत्रणही त्यांच्या कुटुंबियांना यावेळी देण्यात आले. याप्रसंगी स्वप्निलचे वडील श्री. सुरेश कुसाळे व आई सौ.अनिता कुसाळे यांनी स्वप्निलच्या या यशस्वी वाटचालीची माहिती दिली.
याप्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, आर.के.मोरे, अभिजित तायशेटे, किसन चौगले, बी.आर.पाटील (आवळीकर), जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,संग्राम मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.