गांधी मैदान परिसराची श्री. क्षीरसागर यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर दि.२७ : (प्रतिनिधी)
गांधी मैदान ही शहराची अस्मिता आहे. गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होवून, खेळाडूंची गैरसोय होत आहे. गांधी मैदानात पाणी साचू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने दोन टप्प्यात आराखडा तयार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी
५ कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. या निधीतून कामास सुरवात झाली आहे. परंतु, अतिवृष्टीमुळे गांधी मैदानात पाणी साचले असताना त्याचा विपर्यास करून शासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी मैदानात साचलेले पाणी हे निसर्गाची अवकृपा म्हणावी लागेल. हे पाणी तात्काळ निर्गत करण्यासाठी उपाययोजना राबवा. यासह सुरु असलेल्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसमवेत गांधी मैदान परिसराची पाहणी केली. साचलेले पाणी तात्काळ निर्गत करण्याकरिता उपलब्ध असलेल्या नाल्याची तात्काळ साफसफाई करून पाणी निर्गतीचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर महापालिका प्रशासनाकडून त्वरित नालेसफाईच्या कामास गती देण्यात आली.
यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, गांधी मैदानात सांडपाणी आणि पावसाचे पाणी साचत होते. यातील गांधी मैदानापासून निघणाऱ्या नाल्यातील सांडपाणी अडथळा न होता दुधाळी एस.टी.पी प्लांट पर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. निधी मंजूर होवून कामास सुरवात झाली पण अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. वेळेत काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असताना ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नाहक शासनाची बदनामी केली जात आहे. यास सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहे. काम पूर्णच होवू द्यायचे नाही म्हणून ठेकेदारावर कोणी दबाव टाकत असेल तर त्याच्या विरोधात आणि वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा, अशा सूचना दिल्या. यासह गांधी मैदानात साचलेले पाणी हा अतिवृष्टीचा परिणाम असून, उपलब्ध नाल्याची तात्काळ सफाई करून, पाणी निर्गतीचा मार्ग मोकळा करा अशा सूचना दिल्या.
यावेळी श्री.राजेश क्षीरसागर यांच्याशी भागातील नागरिकांनी संवाद साधून उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यावर तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देण्याच्या सूचनाही श्री.क्षीरसागर यांनी दिल्या.
यावेळी महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, विभागीय अधिकारी फुलारे, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपशहरप्रमुख कपिल सरनाईक, रुपेश इंगवले, सुरज साळोखे, शैलेश साळोखे, प्रकाश सरनाईक, मदन चोडणकर, सौ.सरिता हारुगले आदी भागातील नागरिक उपस्थित होते.