पाणीपुरवठा आणि कचरा उठावाच्या कामात हयगय नको : क्षीरसागर यांच्या महापालिका प्रशासनास सूचना
कोल्हापूर दि.२७ : (प्रतिनिधी )
सन २०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीच्या अनुभवानुसार नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, स्थलांतरीत नागरिकांची संख्याही मर्यादित आहे. या नागरिकांकडे कटाक्षाने लक्ष द्या, त्यांना आवश्यक सोई सुविधा पुरवा. आवश्यकता वाढल्यास निवारा केंद्रांची संख्या वाढवा, त्याकरिता आवश्यक पूर्वनियोजन करा. पूरस्थितीचा अनुभव पाहता शहरात पाणी पुरवठा खंडित होणे, कचरा साचणे व यातून रोगराई निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व कचरा उठावाच्या कामात हयगय नको, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास दिल्या.
शहरातील गंभीर होत चाललेल्या पूरस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या उपायोजनांचा राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीच्या सुरवातीस आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील पूरस्थिती आणि निवारा केंद्रांबाबत माहिती दिली.
यावेळी श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गत दोन्ही पूरस्थितीचा अनुभवाने भयभीत नागरिक इतरत्र स्थलांतरीत झाले आहेत. परंतु, ज्यांच्याकडे इतर पर्याय नाहीत, त्यांना सुस्थितीतील निवारा केंद्र उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. यासह त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. शिवसेनेच्या वतीने निवारा केंद्रातील नागरिकांना मदतीचा ओघ सुरु आहे. त्याचबरोबर त्या नागरिकांना आवश्यक इतर सुविधांकडे लक्ष द्या. शहरातील पाणी पुरवठा खंडीत होवून पाण्याच्या टँकरसाठी नागरिकांची धावाधाव होणार नाही, याची काळजी घ्या. बालिंगा, शिंगणापूर, नागदेववाडी पम्पिंग स्टेशन बंद झाल्यास पाण्याचे टँकर पर्यायी ठेवून थेट पाईपलाईन मधून अखंडीत पाणी पुरवठा सुरु ठेवावा. पूरस्थिती काळात निर्माण होणारी रोगराई पाहता कचरा उठावाचे काम नियोजनबद्ध झाले पाहिजे. पुराच्या पाण्यासह वाहून आलेला कचरा तात्काळ साफ करावा. रोगाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पूर परिस्थिती दरम्यान आणि ओसरल्यानंतर सदर भागात औषध फवारणी करण्यात यावी. यासह शहरातील प्रत्येक प्रभागात महानगरपालिका प्रशासनाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. पूरस्थितीमुळे ड्रेनेज लाईन तुंबून दुर्गंधी पसरणार नाही. त्याद्वारे रोगराईचा फैलाव होणार नाही. याची दक्षता घ्या, ड्रेनेज, गटर साफ करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री सुसज्ज ठेवा. यासह तात्काळ विभागीय कार्यालयांच्या बैठका घेवून शहरातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करा, अशा सूचनाही यावेळी राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे, सहाय्यक अभियंता फफे, विभागीय अभियंता फुलारे आदी उपस्थित होते.