मुख्य चौकातील घटना – भार नियमन असल्याने जिवितहानी टळली
कोल्हापूर, ता. २३
(कळे प्रतिनिधी )
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील मुख्य चौकातील मंदिर परिसरात झाड पडल्यामुळे मुख्य वीजेचा पोल कोसळला. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, महावितरणच्या
कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि याबाबत त्वरित
वरिष्ठ अधिकारी यांना कळवले. मात्र,
ठेकेदार उपलब्ध नाहीत. उद्या कामाला सुरुवात होईल,असे सांगण्यात आल्याने दोन दिवस हे गाव अंधारात रहाणार असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वेतवडे गावातील जोतिबा मंदिर परिसरातील मुख्य चौकात नागरिक, लहान मुले व महिलांची मोठ्या प्रमाणावर नेहमी वर्दळ व ये-जा दिसून येते. याच ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास झाड पडल्याने येथील वीजेचा एका बाजूकडील पोल वाकला. त्यामुळे वायरी चौकात अस्ताव्यस्त झाल्या होत्या. यावेळी नेमकी वीज बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे गावातील अनेक नागरिक भयभीत झाले होते. अशावेळी सावधानता बाळगत दिनकर बंडू पाटील व जयसिंग पाटील या ज्येष्ठ नागरिकांनी महावितरणला ही गोष्ट ताबडतोब कळवली. तोपर्यंत झाडाशेजारी घर असलेले बाजीराव पाटील यांनी काही नागरिकांच्या मदतीने, कटरच्या सहाय्याने या झाडाच्या फांद्या बाजुला केल्या.
या घटनेची माहिती मिळताच वीज पुरवठा करणारे कामगार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ठेकेदार उपलब्ध नाहीत. उद्या कामाला सुरुवात होईल, असे सांगितले तर एकीकडे कामाला ताबडतोब सुरुवात न झाल्याने गावातील वीज पुरवठा दोन दिवस पुर्णपणे बंद पडणार असल्याने गावातील नागरिकांतून महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.