लक्ष्मीपुरीतील गारगोटी बस स्टॉप चुकीच्या ठिकाणी, होतोय अपघात, भांडण अन दटावणी…!
कोल्हापूर, ता. १९ —
(महेश गावडे)
लक्ष्मीपुरी जाधव हॉस्पिटल स्टॉप येथील गारगोटी स्टॉपचे स्थलांतर करून तो पुढील सिग्नल जवळ निश्चित केला आहे. पण लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथील गारगोटी स्टॉप चुकीच्या ठिकाणी केला आहे. या स्टॉपमुळे सुभाष रोड मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच होत असून किरकोळ वादावादीचे, भांडणाचे आणि एकमेकांना दटावणी करण्याचे
प्रकार ही घडत आहेत. यातून भविष्यात हिट अँड रन सारखी एखादी केस निर्माण होऊ शकते. रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा
प्रश्न आहे आणि त्यामुळे एस टी प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आत्यंतिक गरज भासते आहे. हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचे उदाहरण आहे. शहरातील अशा विविध चौका चौकात शोधायला गेले तर काही ना काही समस्या या समोर येतील, अशी सद्य परिस्थिती आहे.
लक्ष्मीपुरी येथील जाधव हॉस्पिटल येथे अनेक वर्षापासून एसटीचा गारगोटी स्टॉप होता. या ठिकाणी एसटीचा निवारा शेडही होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा स्टॉप लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथील सिग्नल जवळ हलवला आहे. मात्र हा स्टॉप येथे हलवताना किंवा स्थलांतर करताना त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांकडे एसटी प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसत आहे. एकतर गारगोटी स्टॉप हा अगदी सिग्नल जवळच आहे. येथून सिग्नल सुटल्यानंतर या स्टॉप वर एसटी बस थांबले असल्यास मागून येणारी वाहने खोलंबतात आणि त्यामुळे ट्राफिक जाम होते.
एसटी बस रस्त्याच्या मधोमध थांबते. त्यामुळे एसटीच्या मागून तसेच पुढील बाजूने येणाऱ्या वाहनांना देखील पुरेशी जागा मिळत नाही.
या स्टॉपवर प्रवाशांना थांबण्यासाठी निवारा शेड नाही. परिणामी येथील प्रवासी रस्त्यावरच एसटीची वाट पाहत थांबतात. यात वयोवृद्ध, नोकरदार विद्यार्थीवर्गाचा ही समावेश असतो. बऱ्याच वेळा या स्टॉपवर एसटी बस थांबली असल्यास त्यात एखादा वयोवृद्ध प्रवासी चढत असताना आणि त्याच वेळी जर सिग्नल सुटला असल्यास घाई गडबडीत चालक एसटी पुढे नेताना त्या प्रवाशांची देखील तारांबळ उडते. याशिवाय हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने तसेच सुभाष रोडवरील या दोन सिग्नल मधील अंतर फारच थोडे असल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. तर याच मार्गावरून जाताना पादचारी यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. याच ठिकाणी काही बँका, कॉर्पोरेट कंपन्या, हॉस्पिटल, महा इ सेवा केंद्र, शोरुम, हार्डवेअरची विविध दुकाने, फेरीवाले, पानपट्टी अशी दुकाने असल्याने हा मार्ग अगदी तोकडा ठरतो. स्वयंभू गणेश मंदिर, उमा टॉकीज, दसरा चौक, विन्हस कॉर्नर आदी मार्गावरील वाहने येथून जात असतात. त्या मुळे हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. याच मार्गावरून पर्यटक अंबाबाई मंदिर, सी पी आर, महापालिका, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, मध्यवर्ती एसटी स्टँड या मार्गावर येत जात असतात. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन व्यवस्थित होणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला या मार्गावर रस्त्याच्या बाजूला काहीजण चारचाकी वाहने पार्क करतात, यात काही प्रवाशी वाहतूक करणारी वाहने ही असतात. अशावेळी रस्त्याच्या दुतर्फा जाणाऱ्या वाहनांना आवश्यक जागा मिळणे दुरापास्त होते. यातून काही वेळा हमरी तुमरी होते, भांडण होतात आणि एकमेकांना दटावण्या पर्यंत प्रकरण पोहचते. याला कुठेतरी यंत्रणा आणि प्रशासन याचे या समस्येकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
यंत्रणेवर दोषारोप होणे हे चांगले लक्षण नाही. कारण यंत्रणेकडे नागरिकांना शिस्त लावण्याचा शिरस्ता आहे.
रस्ते चाहतूक हा खरा तर जीवन मरणाचा प्रश्न आहे. याकडे यंत्रणेने जाणीवपूर्वक आणि गंभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शहरात एकतर पायाभूत सुविधा उखडल्या असताना दुसरीकडे वाहतुकीच्या नियोजनाचाप्रवासी यांना भेडसावणाऱ्या समस्येचा अशाप्रकारे झालेला खेळखंडोबा कोणालाही परवडणारा आणि आवडणाराही नाही.
दरम्यान, एसटी प्रवासी यांना भेडसावणाऱ्या समस्येकडे वेळीच लक्ष देणे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यांनी ते बजावायला हवे. जर जीवनात शिस्त असेल तर सर्व गोष्ठी सुरळीत घडतात आणि त्याच ठिकाणी बेशिस्तपणा आला तर गोष्टी बिघडायला, यंत्रणा विस्कळीत होण्यास वेळ लागत नाही.
सर्वांना शिस्त आणि वळण लावायचे असेल तर यंत्रणेने देखील नागरिकांच्या पर्यायाने प्रवाशी वर्गाच्या पायाभूत आणि मूलभूत गरजांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, ही जास्त नाही पण रास्त अपेक्षा आहे.