गोकुळशिरगाव मधील प्रगतशील शेतकरी राजेंद्र गोरे यांचे यश
कोल्हापूर, ता. १४ – (महेश गावडे)
अलीकडच्या काळात रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. मात्र गोकुळ शिरगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र गोरे यांनी सेंद्रिय पिकासह सेंद्रिय गुळ निर्मिती करत आपले वेगळेपण जोपासले आहे. सुमारे ३ एकर ऊस क्षेत्राच्या लागवडीतून वर्षाला साडेतीन टन उसाचा खप होत आहे, हे नसे थोडके..!
गोकुळ शिरगाव येथील राजेंद्र गोरे हे इंजिनिअरिंग मधील डिप्लोमाधारक शेतकरी आहेत. ते सेंद्रिय शेतीसह सेंद्रिय गूळ निर्मितीकडे वळले. गेल्या काही वर्षांपासून ते उसाची लागवड करत असून त्याचे क्षेत्र एकूण तीन एकर आहे. तर एकूण चार एकर क्षेत्रापैकी २ एकरात भात, गहू, हरभरा, सोयाबीन, ज्वारी अशी पिके घेत आहेत. सेंद्रिय पद्धतीने सुमारे दोन एकरात ऊस पीक घेतल्यानंतर त्याद्वारे सेंद्रिय गुळ, काकवी, गुळ पावडरची निर्मितीही ते करतात. त्यांच्या या उत्पादनांना कोल्हापूर, पुणे, मुंबई, सातारा तसेच अन्य शहरातूनही मोठी मागणी आहे. श्री गोरे यांनी मागील वर्षी सेंद्रिय गुळ तपासणीसाठी पाठवला होता, या चाचणीत त्यांचा गुळ पात्र ठरला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी उपलब्धीच ठरली आहे. त्यांची शेती उजलाईवाडी विमानतळाजवळ असून ठिंबक सिंचनाद्वारे ते पिकांना पाणी देतात, त्यामुळे पाण्याची मोठी बचत होते.
दरम्यान, श्री राजेंद्र गोरे यांनी सांगितले की, सध्या कमी वेळेत जास्त फायदा देणाऱ्या पिकांचे उत्पादन घेता येते. मात्र, रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे त्यांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मी सेंद्रिय शेतीकडे वळलो.
अर्धा किलो, एक किलो आणि पाच किलो अशा स्वरूपात ते गुळाच्या ढेपेची विक्री करतात. शंभर रुपये प्रति किलो इतका गुळाचा दर आहे. तर गुळाच्या पावडरचा दर दीडशे रुपये किलो आहे.
दरम्यान, श्री गोरे हे वर्षाला सुमारे साडेतीन टन सेंद्रिय गुळाचा खप करतात. त्यासाठी ते सदानकदा अक्षरशः सेंद्रिय शेतीचा जप करतात, असे म्हटले तर ते गैर ठरणार नाही.