उद्या 14 जुलै रोजी प्रस्तावित 19 गावे पाळणार कडकडीत बंद
पालकमंत्र्यांनी संबंधित 19 गावांना विचारात घेतले नाही : होतंय आरोप
कोल्हापूर, ता. 13 -( महेश गावडे,)
कोल्हापूर शहराच्या हदवाढ विरोधात प्रस्तावित १९ गावांनी एल्गार पुकारला आहे. त्यानुसार उद्या 14 जुलै रोजी संबंधित 19 गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यानुसार सर्वपक्षीय कोल्हापूर महापालिका
हदवाढ विरोधी समिती
यांनी संबंधित गावांना उद्या एक दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
तर आमच्यावर हद्दवाढ लादल्यास आम्ही जन आक्रोश मोर्चाही काढू, असाही इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हदवाढमध्ये
शिरोली, नागाव, वळीवडे- गांधीनगर मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फे ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिंगणापूर, नागदेववाडी,
कंदलगाव, तर औद्योगिक वसाहतीमध्ये शिरोली एमआयडीसी आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी यांचा समावेश आहे.
या 19 गावांचाही कोल्हापूर शहराच्या हदवाढमध्ये येण्यास विरोध आहे आणि उद्याच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा ही मिळत आहे.
दरम्यान, पाचगावचे माजी उपसरपंच संजय शिंदे यांची शनिवारी भेट घेतली असता, त्यांनी 19 गावांमध्ये पुकारलेल्या उद्याच्या बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफ यांनी संबंधित गावांना विचारात न घेता हद्दवाढ करतो असे सांगितले आहे. खरे तर जे स्वतःच्या शहराचा विकास करू शकत नाहीत ते आमचा विकास काय करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंधरावा वित्त आयोगातून आमची कामे सुरळीत सुरू आहेत. आमच्या गावांचा निधी मिळवून ते गावांचा विकास करणार असतील तर यापूर्वी त्यांनी निधी आणून आपल्या शहराचा विकास किती केला आहे हे दाखवावे, असे आवाहनही संजय शिंदे यांनी केले.
संजय शिंदे पुढे म्हणाले, गेली पाच ते सहा वर्षात कोल्हापूर महापालिकेची थोडी देखील सुधारणा झालेली नाही. तर संबंधित 19 गावांना शहरात घेऊन काय सुधारणा करणार, हा खरा प्रश्न आहे. आमच्यावर हद्दवाढ लादल्यास आम्ही जन आक्रोश मोर्चाही काढू, असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या सुमारे सहा वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक आहे. असे असूनही महापालिकेला शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्यापैकी दहा कोटीची कामे देखील झालेली नाहीत, रस्ते प्रश्न गंभीर बनला आहे, भ्रष्टाचारही फोफावला आहे, असा आरोप करत कचऱ्याच्या समस्यांने उग्र रूप धारण केले आहे. अशा अनेक गोष्टी पाहिल्या तर महापालिकेमध्ये जाण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
यावेळी येथे उपस्थित असलेले अमोल गवळी म्हणाले, आम्हाला एखादा दाखला हवा असल्यास तो ग्रामपंचायतीतर्फे दोन ते तीन दिवसात मिळतो. मात्र, तोच दाखला कोल्हापूर महापालिके मधील एखाद्या विभागातून काढायचा असल्यास त्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात. शहरात कचरा उठाव व्यवस्थित होत नाही. अनेक ठिकाणी शहरात कचरा रस्त्यावर टाकला जातो, त्यामुळे दुर्गंधी पसरलेली दिसते. अशा एक ना अनेक कारणामुळे आम्हाला आमचा हद्दवाडिस विरोध आहे. आमच्या ग्राम पंचायत तर्फे स्वच्छता राखली जाते. आम्हाला आमच्या गावातच राहू द्यावे.
यावेळी संग्राम पोवाळकर यांनीही हीच भूमिका विशद केली.
दरम्यान, उद्या संबंधित 19 गावे कडकडीत बंद राहिल्यास बाजारपेठेतील कोट्यावधीची उलाढाल थंडावणार आहे. या प्रश्ननी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट होणे देखील गरजेचे आहे, असे आता बोलले जात आहे.