कोकणातील सडे अर्थात जांभ्या दगडाचे पठार हे जैवविविधतेने संपन्न असे भूभाग आहेत. ते निरूपयोगी किंवा पडीक असे नाहीयेत. खरंतर पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश आहे आणि या परिसरातच कातळ शिल्पांचा होणारा आढळ हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड आदी भागात आढळणाऱ्या या कातळशिल्पांचे आकर्षण आजही तसूभर ही कमी झालेले नाही. या नावीन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण खोदकाम शिल्पांवर आतापर्यंत अनेक डॉक्युमेंटरी, माहितीपट निर्माण झाले आहेत, त्यापुढेही होत राहतील. ही शिल्पे आकर्षणाचा आणि जागतिक पातळीवरील अभ्यासाचा विषय ठरली आहेत, हे मात्र काळ्या दगडावरची रेघ ठरली आहे.
मुळात हे सडे (कोकणात याला सडे म्हणतात) मानवाला शुष्क खडकात जैव विविविधतेची जोपासना कशी करायची,
आपल्या उदरात बीज सामावून घेत ती कशी फुलवायची, ओसाड वाटणाऱ्या कातळ सड्यावर
झरे कसे प्रवाहित करायचे, डोंगर, दरी, खोऱ्यात वसलेल्या मानवजातीचे जीवन कसे संपन्न आणि सधन करायचे असे बरेच काही ते शिकवतात.
हजारो वर्षांपूर्वी याच कातळावर बऱ्याच जणांनी आपल्या लोकसंस्कृतीचे धडे गिरवले होते, याचा दाखला हे सडे देतात आणि पुराव्यानिशीही बोलतात. याचेच नवल वाटते.
कोकणातील अभ्यासक सुधीर उर्फ भाई रिसबूड,
धनंजय मराठे, सुरेंद्र ठाकूर- देसाई, रुत्विज आपटे हे रत्नागिरी जिल्ह्यात कातळ शिल्पांचा अभ्यास करतात.
लांजा तालुक्यात विजय हटकर, सिंधूदूर्गात सतिश लळित, रायगडात डाॅ. अंजय धनावडे यांसारखी अनेक मंडळीही यावर संशोधन करत आहेत. मात्र भाई रिसबुड व टिमने कातळशिल्पाला ख-या अर्थाने जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले आहे. भाई रिसबुड यांच्या निसर्गयात्री संस्थेने कातळशिल्पांचे संशोधन,संरक्षण व संवर्धन क्षेत्रात केलेल्या प्रयत्नाला यश येऊन भारत सरकार आणि देशातील आघाडीच्या विद्यापीठांनी एकत्र येऊन कातळ शिल्पाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून अर्थात जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले. याबाबतचे नॉमिनेशन सध्या झाले आहे. कोकणात कातळ शिल्पांच्या ८ साईटसचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यासंदर्भात नामांकन झाले आहे. यासाठी दहा ते बारा वर्ष पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे.
कोकणात जांभ्या दगडाच्या पठारावर प्रामुख्याने कातळ शिल्पे शिल्पे आहेत. विशेषता पश्चिम समुद्र किनारपट्टीजवळ विस्तीर्ण जांभा दगडाचे पठार आहेत. देवगड, वेंगुर्ले, राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातही शिल्पे भरपूर प्रमाणात आहेत. कोकणात अश्मयुगाच्या कालखंडात मानवी संस्कृती रुजली होती, निपजली होती. याचा हा सर्वात मोठा पुरावा म्हणून याकडे पाहिले जात आहे. काही कातळात प्राणी, पक्षी यांची चित्रे आहेत. तर वेगवेगळ्या भौमितिक आकारातील वैशिष्ट्यपुर्ण आकृत्या, रचनाही आहेत. या आकृत्या आणि रचना म्हणजे त्यावेळची भाषा असण्याची शक्यता आहे. यातील काही आकृत्या चौकोनी,आयताकृती आहेत. हे पूर्वाश्रमीचे नकाशे किंवा त्यांच्या त्या भाषा असू शकतात का, याचा शोध घेण्याचा ही प्रयत्न केला जात आहे.
मुळात एकशिंगी गवा रेडा कोकणात आढळत नाही. लांजा तालुक्यातील रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या पर्यटनसमृद्ध कोट गावातील पठारावरिल कातळशिल्प समुहात २३ फुट लांब व १० फुट उंच गवारेडा पाहायला मिळतो. हे एक ठळक, उठावदार, भरीव, ठाशीव असे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.देवाचेगोठणे येथील कातळशिल्प साईटवर चुंबकिय वुचलन पहायला मिळते.बारसु ,कशेळी येथील कातळशिल्प साईट ही प्रसिद्ध आहेत. ही कातळखोद शिल्पे हजारो वर्षांपूर्वी काढलेली आहेत. अणकुचीदार दगडाच्या साह्याने काढण्यात आलेली ही कातळ शिल्पे आखीव, रेखीव आणि तंतोतंत जुळणारी आहेत. प्राणी, पक्ष्यांची,जलचरांची, माशांची चित्रे आहेत, वाघ आणि बैलांची झुंज असलेली चित्र शिल्पे आहेत. मानवी आकृतीला प्राण्यांची तोंड लावलेली शिल्पे आहेत.
यातून त्यावेळची संस्कृती, त्या वेळचा इतिहास, धार्मिक पगडा,सांस्कृतिक जीवन आदी गोष्टींना या निमित्ताने उजाळा मिळतो आहे.. त्या दृष्टीने सविस्तर अभ्यासही केला जात आहे. या चित्रांचे कोरीव काम सुबकरित्या केले आहे.
या कलाकृती पहिल्या की त्यावेळीं माणूस कोणत्याही कलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेताही चित्रकला किंवा शिल्पकला मध्ये किती पारंगत होता, याचा प्रत्यय येतो. हजारो वर्षे ऊन, पाऊस आणि वादळाच्या तडाख्यात बऱ्याच अंशी यातील काही कातळ शिल्पांची झीज झाली आहे. कोकणाला फारसा मोठा इतिहास नाही, असे बोलले जाते. असा एक मतप्रवाह आहे. भौगोलिक दृष्ट्या दुर्गम आणि पायाभूत सुविधांचा वाणवा जाणवणारा हा भाग खरा तर विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला. आता हळू हळू प्रगती होत आहे, हा भाग अलहिदा. मात्र या कातळशिल्पांच्या आढळामुळे नवाश्मयुगापासून कोकणात प्राचीन अथवा अर्वाचीन काळात मानवी वस्ती, संस्कृती होती, यावर जणू शिक्का मोर्तब झाले आहे. या निमित्ताने या विचाराला, मतप्रवाह याला एक बळ मिळाले आहे, एक नवी, उमदी दिशा मिळाली आहे.
रत्नागिरीतील निवळी येथे सर्वप्रथम कोकण इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष पै.डॉक्टर दाऊद दळवी यांना कातळशिल्प दिसली. त्यांनी त्याच्यावर सखोल संशोधन केले आणि प्राचीन काळातील लोकांनी काढलेले हे शिल्प जतन करण्याची गरज अधोरेखित केली. त्यानंतर अनेक अभ्यासकांचे लक्ष या अस्पर्शित विषयाकडे वेधले गेले. कोकण इतिहास परिषदेचे काम करणारे स्वर्गीय रवींद्र लाड यांनी यावर संशोधन प्रबंध सादर केला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटी – पुणे, टिळक विद्यापीठ- पुणे, पुरातत्व विभाग येथील प्राध्यापक आणि तज्ञ यांनीही कोकणात येऊन या विषयाचे सखोल संशोधन केले आहे.प्रसार माध्यमांनीही या विषयाला चांगलेच उचलून धरले. पुण्यातील दृश्यम कम्युनिकेशन या कंपनीच्या सहकार्याने निसर्गयात्री संस्थेने कातळशिल्पे या विषयावर एक उत्कृष्ट लघुपट तयार केला. आला आहे. या लघुपट इटलीतील ‘डेला कम्युनिक्यासिओन ई डेल सिनेमा ओर्कीओलाॅजीको’ या अांतरराष्ट्रीय महोत्सवात दखविण्यात आला. पुरातत्वशास्त्राच्या दृष्टिने अंत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या महोत्सवात जगभरातील इतिहास ,संस्कृती व पुरातत्वशास्त्र विषयातील तज्ञ उपस्थित असतात.यामुळे कातळशिल्पांचे जागतिक स्तरावरील महत्व अधोरेखित झाले आहे. निसर्गयात्री संस्थेच्या नावाने चालविण्यात येणा-या फेसबुक पेजवर कातळशिल्पे जतन आणि संवर्धन करण्याच्या चळवळीची, जागृतीची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन संचलनालय प्रादेशिक कार्यालय कोकण ,निसर्गयात्री संस्था व पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीने 2022 मध्ये रत्नागिरी मध्ये देशातील पहिला कातळशिल्पांचा महोत्सव भरवण्यात आला होता. या प्रदर्शनात ज्या ठिकाणी कातळ शिल्पांचा आढळ आहे त्या, त्या तालुक्यातून याबाबतच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. तसे पाहायला गेले तर गोवा, कर्नाटक, कोकणात ही कातळखोदशिल्प आढळतात. पण इतर ठिकाणी असणाऱ्या शिल्पांच्या तुलनेत कोकणात मोठ्या प्रमाणात ती आढळून येतात. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे देखील एकाच ठिकाणी वीस ते चाळीस कातळ शिल्पे आढळून आली आहेत. यावर कोकण इतिहास परिषदेचे महाड विभाग प्रमुख श्री. धनावडे सविस्तर अभ्यास करत आहेत. यातील देवाचे गोठणे सारख्या साइट्स वर होकायंत्र काम करत नाही, अर्थात ती योग्य दिशा दाखवत नाहीत. हे खरे तर अचंबित करणारी गोष्ट आहे. बारसुच्या सड्तावर तब्बल १५० चित्रे असुन यातील एकाचे वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी नामांकन झाले आहे. तिथेहि काही अगम्य कातळखोदचित्रे आहेत. अशा अनेक गोष्टींचा शोध लावण्याचा,त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न विविध पातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यावेळची संस्कृती आजच्या एवढी प्रगत नव्हती. अशा काळात अशी भली मोठी, नावीन्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे तयार केली गेली आहेत, याचा पडताळा अभ्यासकांना अनेक ठिकाणी होत आहे. ही एक आश्चर्याची आणि ओत्सुक्याची बाब म्हणावी लागेल.
ही पुरातन शिल्पे कोकणात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामुळे परदेशी पर्यटक तसेच देशांतर्गत पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येऊ लागले आहेत. पुरातत्व विषयाचे अभ्यासक यांच्यासाठी ही एक पर्वणी ठरली आहे.
सिंधुदुर्गातील अभ्यासक सतीश लळीत यांचे कातळ शिल्पांवर एक पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. मध्यंतरी कातळ शिल्प या विषयांवर कर्नाटक तसेच मँगि सिटी रत्नागिरितही सेमिनारही आयोजित केला होता. यातुन दक्षिण कोकणातील वारसा पर्यटनाला चालना मिळणार आहे.
स्थानिक गावकरी देखील अशा शिल्पांकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात. कोणी याकडे एक भय म्हणून पाहते तर कोणी दैवी शक्ती म्हणून पाहतात. ही मोठ मोठी कातळ शिल्पे कोणी आणि का निर्माण केली, त्यामागील नेमका उद्देश काय, त्यातून कोणाला कोणता संदेश पुढच्या पिढीला द्यायचा होता.याचाही शोध आणि बोध घेणे महत्वपूर्ण ठरणार आहे. हा एक प्रकारचा अदभुत, अगम्य पुरातन ठेवा आहे. तो जोपासायला हवा. यामागे असणारी मानवी संस्कृती, प्रोगो ऐतिहासिक संदर्भ,तत्कालीन काळातील मानवाची समकालीन हत्याराची साधने, भाषा, उपजीविकेचे पर्याय,
लोक संस्कृती, आदिवासी जीवन आदी अज्ञात बाबी यावर नव्याने प्रकाशझोत पडणार आहे. कोकणात जांभ्या दगडाच्या चिरेखाणी आहेत. या चिरेखणी गौण खनिजसाठी उत्खनन केल्या जात आहेत.त्यात अनेक अशा आकृत्या, कातळ शिल्पे ही नामशेष झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरे तर कोकण नर रत्नांची खाण आहे. येथील निसर्ग अप्रतिम आहे. येथील अभिजात निसर्ग स्वर्गाची अनुभूती देतो. पण पर्यावरणाला हानी पोहचवून होणारा विकास हा खरा विकास आहे का याचा विचार करण्याची आता वेळ या निमित्ताने येऊन ठेपली आहे. नाहीतर कातळ शिल्पांच्या रूपाने अस्तित्वात असणारा हा अनमोल ठेवा चार पैसे मिळवण्याच्या नादात आपण गमावून बसू, कातळ शिल्प हे त्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. कोकणात अश्या बऱ्याच गोष्टी आणि विविधतेने नटलेली निसर्ग संपदा आहे की ज्याची प्राणपणाने जपणूक करण्याची आत्यंतिक गरज आहे, आणि हेच काम महत्पर्यसाने रिसबूड आणि कंपनी करत आहे आणि त्यांच्या या कामाला मानावेच लागेल. कातळ शिल्पांचा हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहास चिरेखाणीमुळे किंवा तसंम कारणांनी नामशेष झाला तर आपला गौरवशाली आणि वैभवशाली इतिहास आपल्याला कसा समजेल, त्याचा शोध आणि बोध कोण कसा घेईल, अनाकलनीय जीवन रहस्याचा उलगडा कसा होईल, असा प्रश्र्न निर्माण होऊ न देणे हितावहाचे ठरणार आहे, त्यासाठी कोकणचा पर्यावरणपूरक विकास हाच सध्यातरी पर्याय दिसत आहे. पर्यावरणपूरक विकास याचा आटाहासच असा अप्रकाशित इतिहास जिवंत आणि शाबूत ठेवायला मदतगार ठरणार आहे. नव नवीन शोध करता येणार आहे, एक माहित नसलेल्या इतिहासाचा, भूगोलाचा, मानवी संस्कृतीचा उलघडा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर कातळ शिल्पांचा अभ्यास, शोध आणि जतन करण्यासाठी उभी करण्यात आलेली एक प्रकारची नवी चळवळ नक्कीच आणि निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे, आणि ज्यांनी या चळवळीत, या कामी स्वतः ला झोकून दिले आहे, प्रसंगी आपला अमूल्य वेळ आणि पैसा दिला आहे, आपली ज्ञानसंपदा बहाल केली आहे,ते ते सर्वच घटक धन्यच म्हणावे लागतील.