भिकेसाठी देशभर वणवण फिरणारे गोपाळ समाजाचे दृष्टचक्र न थांबणारे ..!
डोळस समाजाने डोळे उघडुन त्यांच्याकडे नीट बघण्याची गरज – प्रशासन यांनी गोपाळ समाजाच्या व्याधीची खातरजमा करून न्याय मागण्या पूर्ण कराव्यात
कोल्हापूर, ता. ११(महेश गावडे)
आज इथे तर उद्या तिथे अशी त्यांची रोज मराची जिंदगी. त्या विधात्याने सर्वसामान्य माणसासारख त्यांना शरीर दिलं असल तरी त्यांना जन्मतः च एक दुर्मिळ विकार जडलाय, नाही तो त्यांच्यासाठी शापच ठरला आणि हाच शाप माथी घेऊन ते पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार फिरत आहेत. अख्ख कुटुंबाच्या कुटुंब कधी पायी, तर कधी रेल्वेतील चोरटा प्रवास करून देशभरात अक्षरशः भीक मागून जगत आहे. ही त्यांच्या जीवनाची खरी तर शोकांतिकाच म्हणावी लागेल. पोटाची खळगी भरण्यासाठी परागंदा होऊन भीक मागून सुखी जीवनाची स्वप्न ते पाहूच शकत नाहीत, त्यांच्या शारीरिक व्याधीमुळे त्यांना हे जगणं दिवसेंदिवस असहय होत आहे, त्यांच्या जीवनाच जितकं ज्वलंत तितकंच हे विदारक वास्तव आहे.
उन्हात गेल्यावर त्यांच्या अंगावर फोड येतात आणि पावसाळ्यात त्यांचं शरीर गारठत, अर्थात, त्यांचं शरीराचं त्यांना साथ देत नाही… त्यांच्या व्याधीवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, मग आपला समाज तरी त्यांना साथ कसा देईल, त्यांनी घातलेली मदतीची साद कोणाला एकु जाईल, हा देखील एक यक्ष प्रश्नच आहे…! त्यांच्यासाठी कोण देवदूत बनून येईल याचीच ते वर्षानुवर्ष प्रतिक्षाच करत आहेत…ही त्यांची चौथी पिढी याची साक्षीदार बनली आहे. त्यांच्या जीवनाची वस्तुस्थिती भयंकर आहे, जीवन जगण्यासाठी त्यांनी चोखाल्लेली वाट भयानक आहे, त्याचे जगणं बेसूर आहे आणि त्यांनी मदतीसाठी फोडलेला टाहो समाजमनाच्या कर्नोपकर्णी पोहचतच नाहीये, हे खर दुखणं आहे.
या गोपाळ समाजाने गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यासमोर शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन केलं. हे धरणे आंदोलन करताना या समाजातील सुमारे 50 सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व सदस्यांचे शरीर एका विशिष्ट दुर्मिळ आजाराने ग्रस्त झाले असल्याने त्यांचे शरीर पांढरे फट्ट पडले होते. फॉरेनचे नागरिक गोऱ्या कातडीचे दिसतात, तशाच वर्णनाचे ते दिसत होते. पहिल्यांदा त्यांना पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल किंवा पाहणाऱ्यांची फसगत हीऊ शकेल, इतके त्यांच्या चेहऱ्याचे साम्य फॉरेन सारख्या गोऱ्या गोमट्या असलेल्या माणसासारखे सेम टू सेम दिसत होते. खरे तर ही माणसे भटक्या विमुक्त समाजातील आहेत. त्यांना ना त्यांच्या हक्काचा निवारा आहे ना हक्काचा रोजगार. कोल्हापुरातील शिरोली, पेठ वडगाव आणि कराड येथे या समाजातील नागरिकांची वस्ती आहे, अशी माहिती मिळाली. ही वस्ती कसली तर त्यांचे साधे मातीचे घर आहे, काही जणांनी काही ठीकाणी तट्ट्या मारून तिथेच वास्तव्य केले आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे त्यांची लहान मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. त्यां पैकी काहीजणांनी आपल्या मुलांना पलूस येथील एका वस्तीगृहात दाखल आहे, अशीही माहिती मिळाली.
या समाजातील जवळपास सर्वच माणसांना विशिष्ट प्रकारचा त्वचा विकार जडल्याने आणि जन्मापासूनच त्यांना डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे (दिव्यांगत्व)
त्यांना कोणी कामच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. आर्थिक मागास परिस्थिती असल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय करता येत नाही. मग त्यांच्यासमोर भीक मागून जगण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. भीक मागण्यासाठी देखील त्यांना एकाच गावात, शहरात नाही तर राज्यात अर्थात देशभरातच भटकंती करावी लागते. कधी केरळ कधी कर्नाटक तर कधी कोकण आधी ठिकाणी त्यांचा हा प्रवास सुरू असतो. त्यांचा बहुतांशी प्रवास हा रेल्वेने होतो. मात्र जिथे खायला, जेवणासाठी त्यांच्याजवळ पैसे नसताना गाडी भड्याला पैसे कुठे मिळतील? त्यांच्याकडे तिकिटाला पैसे नसल्यामुळे ते दिव्यांगासाठी असणाऱ्या डब्यातून प्रवास करतात. मात्र रेल्वे चेकिंग वेळी पोलीस किंवा टी सी यांच्याकडून ते पकडले जातात, त्यांना खाली उतरवले जाते, त्यामुळे पुन्हा संबंधित मार्गावरील दुसरी ट्रेन पकडून आधीसारखाच त्यांचा प्रवास सुरू होतो.
त्यांचं एक अख कुटुंबच भीक मागण्यासाठी महिनोन महिने बाहेर असत. ते भीक मागून पोट भरत असल्यामुळे कधी पोलिसांच्या कडून त्यांना मार बसतो, तर कधी रात्री अप रात्री भुरट्या चोरांकडून त्यांना लुटले जाते. त्यांनी भीक मागून जमा केलेल्या पैशांवरही डल्ला मारला जातो. अशी एक ना अनेक विघ्ने त्यांच्या वाट्याला येतात. त्यामुळे या नागरिकांनी आपल्याला न्याय मिळावा अशी साद कोल्हापुरातील जिल्हा प्रशासनाला घातली आहे. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नाही. येथील बहुतांशी जनाकडे आधार कार्ड, रेशन कार्ड असे कोणताही पुरावा नाही. त्यामुळे आपल्याला मोफत धान्य, विनाअट जन्म दाखला, जातीचा दाखला आणि घरकुल मिळावे, पेन्शन मिळावी अशी त्यांनी शासन दरबारी मागणी केली आहे.
कोल्हापुरातील पेटवडगाव, शिरोली किंवा कराड इथे वर्षांवर्षापासून वास्तव्यात आहेत.या समाजातील अब्दुल यांनी आपली कैफियत मांडली.. आम्ही जेव्हा भीक मागायला जातो तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा वाईट अनुभव येतात. तुम्ही धड
धाकट माणसे आहात, राबुन खावा, भीक कशाला मागता, असेही अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. मात्र आमचं दुखणं कुणाला मुळी समजतच नाही, उन्हात गेल्यावर आमच्या त्वचेवर फोड येतात, पावसाळा आमच्या शरीराला मानवत नाही, आम्ही आजारी पडतो. जन्मापासूनच आमच्या दोन्ही डोळ्यांना कमी दिसते, ही आमची समस्या आहे.
आम्हाला खरे तर भीक मागून जगायला आवडत नाही. शासनाने आमचे पुनर्वसन करून आमच्या हाताला काम द्यावे अशी मागणी त्यांनी केलीआहे.
खरतर गोपाळ समाजाची ही चौथी पिढी भिकq मागून आपलं पोट भरत आहे, आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करत आहे, यातील बरेच जण मतदानाचा हक्क बजावतात, मात्र त्यांना अजूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत, भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा त्यांच्या जवळ नसल्याने ते बहिष्कृत असल्यासारखे जीवन जगत आहेत.
त्यांच्या सत्यातेची आणि न्याय मागणीची खातरजमा करून त्यांना न्याय मिळायाला हवाय.