एसटी प्रशासनाला प्रवाशांच्या गैरसोयीचे काही देणे घेणे राहिलेले नसल्याची होते टिका
कोल्हापूर, ता..८ – (महेश गावडे)
अविरत जन सेवेची पंचाहत्तरी पूर्ण करून सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी एसटी लोकप्रिय ठरली आहे. मात्र, एसटी प्रशासनाने आता एसटी प्रवाशी यांना ग्रहीत धरून चालणार नाही. कारण आज अनेक एसटी बस थांबे, अर्थात निवारा शेड अस्तित्वात नसल्याचे दिसत आहे. परिणामी एसटी चे प्रवाशी निवारा शेडविना रस्त्यावर उभे राहून एसटीची ताटकळत वाट पाहत बसत आहेत. एसटीचे फक्त उत्पन्न वाढीकडे लक्ष असून प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे अक्षरशः दुर्लक्ष झाले आहे, अशीच वास्तव परिस्तिथी आहे.
लाल परीने खेडोपाड्यात सेवा दिली आहे आणि आजही देत आहे. एसटीच्या अनेक योजना आज लोकप्रिय आहेत. म्हणूनच जनसामान्यांमध्ये एसटीचे स्थान आढळ आहे. असे असले तरी एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या अनेक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलेले असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. आता हेच पहा ना कोल्हापूर शहर आणि परिसरात असणारी पूर्वी एसटीची निवारा शेड गेल्या काही वर्षांपासून बंद केलेली आहेत किंवा काढून टाकलेले आहेत. त्यामुळे आज कोल्हापूर शहरांतर्गत अनेक एसटी थांब्यांवर एसटीचे प्रवासी निवारा शेड विना ताटकळत थांबत असल्याचे दिसत आहे. या प्रवाशांना हक्काचा निवारा नसल्याचं सध्या चित्र आहे.
याबाबत एसटीच्या अधिकृत सूत्राकडून माहिती घेतली असता, शहरांतर्गत २० किलोमीटर अंतरापर्यंतचे बस स्टॉप के एम टी कडे वर्ग केले आहेत, अशी माहिती मिळाली.
शहरांतर्गत २० किलोमीटर अंतरापर्यंतचे बस स्टॉप के एम टी कडे वर्ग केले असतील तर एसटीचे प्रवासी थांबणार कुठे, हा यक्ष प्रश्न आहे.
आज पाहायला गेले तर लक्ष्मीपुरी कोंडा ओळ, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा टॉकीज, हुतात्मा पार्क, आईचा पुतळा आदी ठिकाणी एसटीचे निवारा शेड नसल्याचे चित्र आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर, दसरा चौक येथील शाहू स्मारक जवळ
के एम टी थांबा आहे. याच ठिकाणी कागल आणि हुपरीचा एसटी थांबा आहे. के एम टीचे प्रवासी ह्या ठिकाणी निवारा शेडमध्ये थांबल्यास एसटी प्रवाशांना या शेडमध्ये थांबण्यास जागा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. इतकेच कशाला टाऊन हॉल येथील एसटीचा थांबा याचे जिवंत उदाहरण आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी या ठिकाणचा निवारा शेड पडझडीमुळे काढलेला आहे. मात्र हा निवारा शेड वारंवार मागणी करूनही अद्याप बांधलेला नाही. परिणामी पन्हाळा, मलकापूर आदी ठिकाणचे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, वयोवृद्ध मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावरच दररोज एसटीची वाट पाहत उभे असतात. हे चित्र पाहिले की एसटीला या प्रवाशांच काय देणे घेणे आहे की नाही, असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही.
कोंडाओळ येथील एसटीचा बस स्टॉप अगदी सिग्नल जवळच केलेला आहे, आणि तो चुकीच्या जागी आहे
एखाद्या वेळी सिग्नल सुटल्यास येथील बस स्टॉप मुळे ट्राफिक जाम होते. या ठिकाणी देखील एसटीचे प्रवासी निवारा शेडविना दुकानांचा आसरा घेत थांबलेले दिसतात. हा एसटी थांबा येथून त्वरित दुसरीकडे हलविण्याची गरज आहे, हा थांबा पूर्ववत जाधव हॉस्पिटल जवळ स्थलांतरित करावा, अशी मागणी होत आहे.
ज्या प्रवाशांच्या जीवावर एसटी चालते, त्या प्रबाशांच्या न्याय मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत तर, यासारखे दुर्दैव ते काय? एसटी प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि गैरसोय दूर करावी, अशी मागणी आता प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.