स्टेशन रोडवर अर्धा किलोमीटर पर्यंत वाहते ड्रेनेज लाईन, पाईपलाईनचे पाणी
कोल्हापूर, ता. ८ – ( महेश गावडे)
कोल्हापूर शहराला अवकळा प्राप्त झाली आहे. ही अवस्था केविलवाणी आणि बकाल अशीच आहे, असे म्हटले तर ते गैर ठरू नये. याला कारण ही तसेच आहे.
कोल्हापूर शहरातील बऱ्याच ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर कचरा फेकला जात आहे. हे विचित्र चित्र पाहिले की, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाची भाषा करणारे तथाकथित पुढारी आणि नेत्यांना ही दुर्दशा दिसत नाही का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरच्या स्वप्नवत विकासाची कोटीची उड्डाणे करण्याची भाषा बोलणाऱ्यांनी एकदा कोल्हापूर शहरातील रस्त्यावरून, जमिनीवरून चालावे, म्हणजे त्यांना आपल्या शहराची सद्यपरिस्थिती काय ती समजेल, असेही आता नागरिकांतून बोलले जात आहे.
कोल्हापूर शहर हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहराला एक इतिहास आहे. ऐतिहासिक, सामाजिक सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर शहर अग्रेसर आहे. कोल्हापूरचा साज, कोल्हापूरचा गुळ, कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी फेटा अशा एक ना अनेक वस्तू प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरातील करवीर निवासिनीी श्री अंबाबाई मंदिर, रंकाळा न्यू पॅलेस, कनेरी मठ, राजवाडा देखील तितकेच प्रसिद्ध पावले आहेत. लय भारी कोल्हापुरी म्हणून कोल्हापूरकर अभिमानाने मिरवतात. ही खरी तर अभिमानाची गोष्ट आहे. मात्र आज शहराचे चित्र पाहिले तर ते किळसवाण या सदरात मोडते. कोल्हापूर शहरातील बऱ्याच ठिकाणचे रस्ते रस्ते कामामुळे उखडले आहेत, त्यांची पूर्ववत दुरुस्ती केली नाही. परिणामी पावसाळ्यामध्ये हे खड्डे चुकवताना वाहनधारकांची दमछाक होते, तर या मार्गावरून चालताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. सासणे मैदान रोड आणि स्टेशन रोड ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. सासणे मैदान रोड वरून जाताना आपण एखाद्या खेडेगावात तर आलो नाही ना, असा प्रश्न पडतो. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. तर स्टेशन रोडवरीलही परिस्थिती काही वेगळी नाही. गेल्या बऱ्याच दिवसापासून या मार्गावरील ड्रेनेज लाईन किंवा पाईपलाईन फुटली आहे. त्याचे पाणी जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत वाहत जाऊन पुढेे गटारीला मिळते. शाहूपुरी पोलीस स्टेशन समोर रस्ता गटारगंगा झाला आहे. मात्र याचे सोयर सुतक ना कोल्हापूर प्रशासनाला आहे ना पोलीस प्रशासनाला, अशी सद्यस्थिती आहे.
रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना इकडून तिकडे खड्डे युक्त डबक्यावरून उड्या मारत आणि वाहनधारकांना आदळ आपट करून मार्गक्रमण करावे लागत आहे. अर्थात त्यांचा काहीसा असा प्रवास हा हवेतूनच होत आहे!
शहराच्या सुरुवातीला असे चित्र पर्यटकांच्या निदर्शनास पडले तर पुढील चित्र काय असेल, याची कल्पना न केलेली बरी, अशी पर्यटकांची मनोवस्था होऊन जाते.
मुळात हा प्रश्न मांडायचा कोणी आणि सोडवायचा कोणी, असा प्रश्न बहुदा यंत्रणेला पडला असेल.
मागील वर्षी देखील या मार्गावर अशी समस्या उद्भवली होती, ती समस्या सध्या पुन्हा उदभवली आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासाची कोटीची उड्डाणे करणाऱ्या तथाकथित नेत्यांना या समस्येचा जणू विसरत पडला आहे, अशी टीका आता ज्येष्ठ नागरिकातून होत आहे. शहराचे आजचे चित्र असे असेल तर कोल्हापूरच्या सर्वांगीण विकास कधी आणि केव्हा होईल, हा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे आणि याचे उत्तर आज तरी बहुदा कोणाजवळच नाहीये, असे खेदाने म्हणावे लागत आहे. महापालिकेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कोल्हापूरचा विकास ठप्प झाल्याचे बोलले जात आहे, असे असले तरी ज्या नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे, आणि ज्या समस्यांनी नागरिक वारंवार त्रस्त होत आहेत, त्या समस्या एक लोकप्रतिनिधी पदाच्या पलीकडे जाऊन सोडवायला नकोत का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी लोक वर्गणीतून एकजुटीने रस्त्याची आपल्या गावातील, भागातील मोठ मोठी कामे केल्याची यापूर्वी उदाहरणे आहेत. मात्र या उदाहरणाकडे आणि आदर्शआंकडे दुर्लक्ष करून प्रत्येक जण एकला चलो रे, आशा भूमिकेत वावरत आहे, आणि ही बाब कोल्हापूरच्या विकासाला कुठेतरी खिळ घालणारी ठरत आहे. कोल्हापूरकर देखील आपल्या प्रश्न समस्यांबद्दल सुशेगाद आहेत का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. कारण आजची युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. या शक्तीच्या जोरावर अनेक अशक्य कामे शक्य होतात. मात्र, युवावर्गाने देखील कोल्हापूर शहराच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याकडे, कानाडोळा केल्याचे दिसत आहे. खरेतर
श्रमशक्तीच्या जोरावर युवाशक्ती आपल्या भागातील नागरी समस्या सोडवू शकते , मात्र जशी राजकीय इच्छाशक्ती आड येते, तशी या युवा वर्गाच्या मध्ये इच्छाशक्तीची वानवा जाणवत आहे.