एसटीच्या 12 आगारात बुकिंगची सोय, ज्येष्ठांसह महिलांना सवलतीच्या योजना भारी
कोल्हापूर, ता. ८ –
(महेश गावडे)
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी कोल्हापुरातून ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर आगारातून एकूण 280 बसेस या वारीसाठी सोडण्यात येणार आहेत, त्याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे, अशी माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी समाज धन टाईमशी बोलताना दिली.
दरम्यान, 44 किंवा त्या पेक्षा जास्त संख्येने फक्त महिला वर्ग वारीसाठी एखादी एसटी बुकिंग करता येऊ शकणार आहेत.
लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाच्या भक्तांना आषाढी वारीसह विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची आस लागली आहे. १३ जुलै ते 22 जुलै या कालावधीत आषाढी पंढरपूर यात्रा संपन्न होणार आहे. तर 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवासी आणि वारकऱ्यांसाठी यात्रा कालावधीत कोल्हापूर विभागामार्फत 280 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याबाबतचे नियोजन सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.
या यात्रे करिता कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सर्वच गावांमधून भाविक प्रवासी पंढरपूरला जातात. 44 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून बसची मागणी केल्यास त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून थेट यात्रे ठिकाणी आणि परत गावापर्यंत अशी जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना मोफत प्रवास, महिलांसाठी महिला सन्मान योजना अंतर्गत तिकीट दरात 50 टक्के सवलत यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहतील. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या आगार किंवा बस स्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क साधवा. कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंगलज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगन बावडा आणि आजरा या आगारात जाऊन या गाड्यांचे आगाऊ आरक्षण याबाबतची अधिक माहिती घेता येऊ शकेल.
आषाढी वारीच्या दरम्यान वारकऱ्यांना वारी यात्रेसाठी, कुठेही जाण्यासाठी एसटीची गरज भासल्यास त्या ठिकाणाहूनही एसटीची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती श्री. बोगरे यांनी दिली.