पूर्वी रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्हा वेगळा नव्हता. रत्नागिरी एकच जिल्हा होता. भौगोलिक असमानता किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू लागल्याने त्याचे विभाजन करण्यात आले असावे. माहिती प्रमाणे त्यामुळे 1983 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला…लोक संस्कृती आणि लोक जीवन याचे साम्य दोन्ही जिल्ह्यात एकच आहे. पण आपली भाषा कोसा कोसावर बदलते. त्या प्रमाणे या प्रदेशात देखील कोकणी, मालवणी, संगमेश्र्वरी, ग्रामीण कोकणी, घाट माथ्यावरील कोकणी भाषेत कमी अधिक प्रमाणात फरक आढळतो. मात्र जो
जो मुळ कोकणी आहे, त्याला या भाषेतील साम्य समजतं किंवा तो ती भाषा समजू शकतो.
कोकणी भाषेची लय आणि लहेजा, म्हणी, वाक्यप्रचार, भाषेचा टोन, बोलण्याची पद्धत, भाषेचे वैशिष्ट्ये, कोकणी भाषेमध्ये काही शब्द गोवन, फारशी, उर्दू मराठी किंवा संस्कृत या भाषेमधूनही घेतलेले आहेत. ते मुद्दाहून घेतलेले नसून बोलण्याच्या ओघात अथवा अनाहूतपणे ते दैनंदिन व्यवहारांमध्ये संवादामध्ये आलेले दिसतात. मात्र, कोकणी भाषा इतर कोणत्याही भाषेची copy नक्कीच नाही.
येथे उदाहरण सांगायचे तर…
मराठीमध्ये
मला पेरू पाहिजे, याला
ग्रामीण कोकणी भाषेत
माका *प्यार* व्हया, असे बोलले जाते.
तुझा मुलगा चावट आहे
याला तिकडील भाषेत
तुझो *झील* फाजील आसा, असे म्हटले जाते.
*मालवणी गजाली* कोणी ऐकल्या किंवा वाचल्या असतील त्यांना यातील फरक पटकन जाणवू शकेल कदाचित…
मुळात कोकणात राहणारे भाग्यवान आहेत..पृथ्वीवरचा स्वर्ग कुठे असेल तर तो कोकणात आहे, असे म्हटले जाते. पण आमच्यासारख्या चाकरमान्यांना मुळ कोकण रहिवाशी आहे तरी ज्यांचा जन्म कोकणाच्या बाहेर झालेला आहे. त्यांना मात्र आपली कोकणी भाषा पूर्णपणे आत्मसात करता आली नाही. तेथील लोक संस्कृती, लोकजीवन, परंपरा (म्हणी, वाक्य प्रचार, लोक गीत, गाऱ्हाणी, देवादिकांचा इतिहास, त्याचे महात्म्य, कुलाचार, मानपान, गावातील तंटे गावातच मिटवण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत, अर्थात गावातच न्यायदानाची पद्धत.) याचा सविस्तर अभ्यास म्हणजे एखादा शोध निबंध करण्याची इच्छा, असूनही ती पूर्ण होऊ शकली नाही.
कोकणातील मातीत नर रत्नाची खान आहे असे म्हणतात. या मातीचा गुण वेगळा आहे. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हे आहे. मंगेश पाडगांवकर (वेंगुर्ला), पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी – रत्नागिरी – पालगड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं.दा. करंदीकर – घालवली – सिंधुदुर्ग, मधु मंगेश कर्णिक – करूळ सिंधुदुर्ग, वसंत सावंत- सांगुळवाडी, सिंधुदुर्ग, आरती प्रभू – सिंधुदुर्ग. आदी लेखक, साहित्यिक याच
भूमीतील. तर ज्यांनी जाज्वल्य देश प्रेमाची धग प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रज्वलित करून ती सदैव धगधगत ठेवली, असे वीर क्रांतिकारी आणि थोर विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – रत्नागिरी, वि. दा. सावरकर-जन्मभूमी नाशिक मात्र कर्मभूमी रत्नागिरी, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर- देवगड, पोम्बुर्ले, गोपाळ कृष्ण गोखले- कोळतूक रत्नागिरी हे कोकणातीलच.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणखीन महत्त्वाचे नेते समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणितज्ज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सर्व मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.
अर्थात कोकणभूमी नर रत्नांची खान आहे. हे त्यामुळेच…महात्मा गांधींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह केला होता तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह आंदोलन झाले होते.
या थोर साहित्यिकांचा किंवा थोर विचारवंतांचा वा थोर क्रांतिकारक यांच्या समग्र साहित्याचा समग्र लढ्याचा शोध नि बोध नव्याने ही घेता येईल. इतकेच नव्हे तर जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या या परिसरातील अनन्य साधारण अशी वनसंपदा, पक्षी, प्राणी, दुर्मिळ वनस्पती, याचा देखील धांडोळा या निमित्ताने घेता येईल. सिंधुदुर्गात तर हत्ती, गवे, बिबट्या, वाघ, राज्य प्राणी शेकरू, अस्वल, मलबार पिट वायपर snake, जम्पिंग फ्रॉग, वैशिष्ट्यपूर्ण सरड्याच्या आणि नदीतील मासे यांच्या प्रजाती यांचा आढळ आहे.
स्थानिक प्रत्येक गुढ आणि रहस्यमय जागेची, त्या त्या सर्वाधिक चर्चेतील ठिकाणची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील कातळ शिल्पांचा नव्याने शोध लागत आहे. माजी माहिती उपसंचालक सतीश लळीत, दोडामार्ग हे या विषयावर अभ्यास करत आहेत. सिंधुदुर्गातील कातळ शिल्पे या विषयावर त्यांचे पुस्तके प्रकाशित झाले आहे.
यातून नवीन लोकसंस्कृती, लोकजीवन त्याचा पूर्व इतिहास, गुड रहस्य उलघडण्यास मदत होणार आहे.
इथे नारबांच्या अनेक वाड्या आहेत…. गरिबांच्या केंबळ्यांच्या म्हणजे झोपड्या आहेत, समुद्र तट आहेत, खाड्या आहेत, जल भ्रमंती करण्यासाठी तराफे, नावाड्या आहेत. उंचच उंच नारळाच्या बागा आहेत. चक्क कातळावर रुजून, उपजून साऱ्या देशाला सुमधुर रसाळ हापूस पुरवणारे आंब्याच्या जणू खानी आहेत. निवती, भोगवे, मांडवी, जयगड बंदर अशी प्रेक्षणीय स्थळे, निवती समुद्रात डॉल्फिनच्या कोलांट्या उड्या, नदी, खाडी किनारी रापून पकडल्या जाणाऱ्या कुर्ल्या, म्हणजे खेकडे, झिंगे संगे इथे जीवन पदोपदी रंगे…असच लई भारी चित्र आहे.
भजन, कीर्तन, डबल बारी, दशावतार, यात्रा, जत्रा यांच्या सह फेनीची मात्रा, कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव, कोकण रेल्वेतील ही गर्दी, मासळीचा बाजार आणि त्याचा पसरलेला घमघमाट, केळीच्या पानावर सुग्रास अन पंचपक्वानांचा हवाहवासा वाटणारा चविष्ट घास, सुरूच्या बनात अन् समुद्राच्या रेतीच्या अंगणात पहुडन, हुंदडण…
एकमेकांच्या अवशोचो घो काढून एकमेकांची खेचण्याची लागलेली निखळ स्पर्धा,
मेल्यान माका फसयल्यान…अशी मारली जाणारी खोपरखळी, माझा तुझ्यावर प्रेम असा असे म्हणत करण्यात येणारी प्रेमाची कबुली, कोकणी पद्धतीनं होणारी लग्न समारंभ, उखाने, पाच परतवान, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तयार करण्यासाठी असणारी वेग वेगळी चुल, खोल्या, गणपती बाप्पा यांच्या गणेश उत्सव प्रतिष्ठापना करण्यासाठी असणारी स्वतंत्र खोली, घरात पावसाळ्यात थंडी वाजू नये यासाठी असणारा परशा याला शेकोटी असे ही म्हणतात. कंदीलाच्या प्रकाशात रात्रीच्या वेळी पावसाळ्यात करण्यात येणारी चढत्या पाण्यातील मासेमारी, काटेरी झुडपात जाऊन काढण्यात येणारी करवंद, कोंडीत म्हणजे गावातील नदीच्या पाण्यात करण्यात येणारी अंघोळ, झऱ्याच निर्मळ पाणी ते मिनरल वॉटरलाही मागे टाकेल असे अभिजात शुद्ध पाणी, डोंगर दऱ्यात आणि दुर्गम भागात वसलेली छोटी छोटी पण हवीहवीशी वाटणारी घर, पूर्वी कोसो मैल पाण्यासाठी पायपीट करत झऱ्याच आणण्यात येणार पाणी याची आज ही आठवण येते. कोकणात विशेषतः रेडे यांना घेऊन शेती ची मशागत केली जाते.
कुडो, पायली, मापट असे धान्य मोजण्याच साधन असायचं. घरात पिकवलेल धान्य साठवायला विशिष्ट प्रकारच्या बांबूपासून बनवलेली डवली असायची, आजही काहिंकडून त्यात धान्य साठवून ठेवलं जातं.
काहींच्या अंगात शिरलेली भूत काढण्यासाठी कोकणात बऱ्याच देवस्थान मध्ये 20 ते 25 वर्षातून एकदा येणारा बारस हा कार्यक्रम असतो.
देवाचे गण हे झपाटलेल्या यांच्या अंगातील ही भूत काढतात अशी श्रद्धा किंवा समज आहे.
कोकणात गणेशोत्सवाबरोबर होळीचा सण हे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील बहुतांशी नागरिक हे पोटापाण्यासाठी पर जिल्हा, पर राज्य, परदेश मध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र ती आपल्या गावापासून कितीही कोस दूर असली तरी गणेशोत्सवात हमखास आपल्या मूळ गावी कोकणात यायला विसरत नाही.
ही माती त्यांना खऱ्या अर्थाने नाती शिकवते. नात्यातील ऋणानुबंधाचा धागा बळकट करण्याची ओढ आणि ती भावना त्यांच्या अंतकरणात असते म्हणूनच आपल्या माणसांना आणि आपल्या मूळ घराला कोकणी माणसं विसरत नाहीत.
घरातल्या वयस्कर मंडळींना आपण कितीही मोठी झालो तरी त्यांना आदराने आणि प्रेमाने हाक मारली जाते. इतकेच नाही तर शेजारी पाजारी लोक दिसली की त्यांना,
काय, बरो असय मा, काय चलला हा…अशा शब्दात दखल घेतली जाते.आपल्या सोबत येताना आणलेली भेट किंवा खाऊ शेजारी पाजारी यांनाही दिला जातो. त्यात मायेची, ममत्व याची भावना असते.
वाडीवर कोणालाही कशाची गरज लागली तर कार्यकर्ते जीवाचे रान करतात. सहकार्य, परोपकार, सहृदयता हे गुण कोकणी माणसाच्या कडे उपजतपणे आहेत.
दे हरी खाटल्यावरी, आयतो वडो तोंडात पडो, अवाड तर सवड, अशा अनेक थेट डोक्यात शिरणाऱ्या म्हणी आहेत. मनाला भिडणाऱ्या लोकगीतांची गाणी आहेत. फणस, काजू, पेरू, जांभळे, करवंदे, अननस, स्ट्रॉबेरी, उस, कलिंगड, भात, नागली म्हणजे नाचणी, वाल, औषधी लाल भाजी, अळंबी अशी भरपूर पिके रुजवणारी पोटात सामावून घेणारी डोलदार पिके आहेत.
वडे सागोती, मासा, कोळंबी, पापलेट, आम्लेट हरतरेची खाद्य संस्कृती इथे रुजत आहे. पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. देशांतर्गत पर्यटनालाही बहर आला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक यांनाही या भूमीची भुरळ पडत आहे. उंच उंच लाटावर स्वार होऊन इथं सर्फिंग, outing, बोटिंग, स्कुबा डायविंग होत आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी, मालवणची मेजवानी, देवगड, विजयदुर्गची सफारी, सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थळ, पाऊलखुणा याच्यापुढे प्रत्येकजण नतमस्तक होत अभूतपूर्व पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. कुणकेश्वर आतील महादेव मंदिर, मालवण धामापूर, तारकर्ली, शिरोडा समुद्र किनारी मधील एका दिवसाचा होल्ट, सावंतवाडी मधील शिल्प ग्राम, मोती तलाव, कुडाळ वालावल मधील श्री महालक्ष्मी मंदिर, धामापुर, वेंगुर्ल्यातील दीपस्तंभ, रत्नागिरीतील मंडणगड, पावस अशी ठिकाणे सुंदर आहेत.
गणपतीपुळे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी नद्या यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगेत होऊन त्या पश्चिम दिशेला वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात.
गुहागर येथे कासव जन्माचा सोहळा पाहण्यासारखा असतो. मुळात गुहागर, दापोली, रत्नागिरी, मंडणगड, वेळास अशा समुद्र ठिकाणी कासवांच्या पिल्लांचा जन्म सोहळा आणि पुन्हा त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्याचा नजारा नजरेच्या कोंदनात साठवून ठेवण्यासारखाच.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच गड किल्ले आहेत. येथील पर्यटनाला अजून मोठा वाव आहे. येथे पर्यटनातून रोजगार निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग साकार झाला तर आणि कोल्हापुरातील सोनवडे घाट रस्ता मार्गी लागला तर दुधात साखरच नाही तर गुळच. पण राजकर्त्यांच्या इच्छाशक्तीचे मूळ याच्या आड येत आहे.
येथील इतिहासाचा, भूगोलाचा, साहित्याचा, क्रांतिकारकांचा, जैवविविधतेने संपन्न असलेल्या प्रदेशाचा अभ्यास करायचा म्हटलं तर एक जन्मही पुरणार नाही आणि येथील एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण विषयाचा अभ्यास करायला घेतला तर आपल्याला वेळही पुरणार नाही. यासाठी पुन्हा एकदा (मला) माझ्यासारख्यांना प्रत्यक्षात कोकणात जन्म घ्यायला लागेल..
– महेश गंगाराम गावडे
– पत्रकार
– समाजमन बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष
– कोल्हापूर.