हे बॉम्बे शहर हादसोंका शहर हैं, यहा जिंदगी हादसोंका सफर है….यहा रोज रोज हर मोड मोड पर होता हैं कोई ना कोई हादसा….हादसा…. हे जुन्या हिंदी चित्रपटातील गान अजूनही अनेकांना आठवत असेल….आज फक्त मुंबईचं नाही तर सर्वच ठिकाणी असे अपघात नित्याचेच झाले आहेत. एखादा गंभीर वा भीषण अपघात होतो, याची वार्ता वृत्तपत्रातून प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होते. याबदल जनमानसात हळहळ ही व्यक्त होते, दुसऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी होतो. पण त्यानंतर घटनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आपण या घटना विसरून आपल्या कामाला लागतो. यंत्रणा ही अशा अपघातावर, घटनांवर तोडगा किंवा कायमस्वरुपी मार्ग काढण्यात आसमर्थ ठरते. समाजात असे अपघात होत राहतात, दुःख व्यक्त होत राहते, पण अपघातांची मालिका अखंडित सुरूच राहते….एक न संपणारी मालिका…एक दृष्टचक्र…एक शोकांतिका…काळीज पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या….शोक सागरात बुडालेला परिवार, सांत्वन करण्यासाठी लागलेली रिंग, शासनाकडून मदतीचा हात…असे चित्र उभे राहते.
मात्र त्यानंतर जो तो आपल्या कामाला लागतो.
असे म्हणतात की अति घाई संकटात नेई…. संकट ही कुठून आणि कधी येतील हे तसं कोणाला सांगता येत नाही. जमिनीवरून येतील की आकाशातून टपकतील हे कोणी सांगू शकत नाही. म्हणूनच त्याला काळ म्हणतात. पण अनेकजण जीवघेण्या अपघातातून वाचतात, तेव्हा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असेही बोलतात…
मात्र या आणि अशा संकटाची चाहूल घटनेपूर्वी आपल्याला लागू शकते आणि संकट आलीच तर ती अस्मानी आणि सुलतानी स्वरूपाची असू असतात, हे देखील तितकेच खरे असते.
हे अपघात जीवघेणे ठरू शकतात. या अपघातात जीवाभावाची माणसं कायमची देवाघरी निघून जात असतात. अशा गंभीर आणि भीषण अपघातात एखाद्याची रक्ताची नाती संपुष्टात येऊ शकतात. अनेकजण अशा अपघातात आपलं सर्वस्व ही गमावून बसू शकतात. अनेकांसाठी हे अपघात एक आघात असतात.
कोणाचं या अपघातात मुल तर कोणाच्या घरातील पालक कायमचे गमावून बसतात. यातील बरेच अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. यंत्रणेतील दोषामुळे सुद्धा काही अपघात होतात. मात्र अशा दोन्ही प्रकारातील हे अपघात टाळले जाऊ शकतात.
यंत्रणेतील दोष देखील मानवनिर्मित असू शकतात. या दोषांचे निराकरण करणे गरजेचे आहे.
हॉर्न ok प्लिज असे ट्रक गाडीवर लिहिले असते, किंवा चालक शिकत आहे, किंवा पुढे घाट रस्ता आहे, गाड्या सावकाश चालवा, चुका ध्यान – गई जान,
अशा सूचना का केल्या जातात, यामागे कारण तसेच आहे. गाडी चालवताना मन, मनगट आणि डोके ठिकाणावर ठेऊन गाडी चालवायला हवी. शरीर एकीकडे आणि मन दुसरीकडे असे होता नये.
गाडी चालवताना हयगय किंवा निष्काळजीपणा तर अजिबात करू नये.
माणूस एखादी चूक करतो. मात्र ती चूक करण्यापूर्वी चूक होऊच नये असा विचार करणे गरजेचे असते. बऱ्याच मोठमोठ्या होऊ शकणाऱ्या संभाव्य चुका देखील सतर्कतेमुळे आणि दक्ष नागरिकांच्या जागृतीमुळे टळ्ल्या आहेत हा इतिहास आहे, किंवा पूर्वा अनुभव म्हणावा हवा तर… त्यामुळे पर्यायाने संभाव्य अपघात, आघात देखील टळले आहेत. काळजाला म्हणूनच अनेकांच्या चटका बसला नाहीये, तो चटका
लागग्ण्यापासून वाचला आहे. असा चटका कोणालाही बसू नये, तो लागू नये, असो.
बर हे देखील इथे लक्षात घेन्याजोगे आहे.
बरेच असे अपघात होतात की ते चित्र विचित्र असतात. यात कोणाचीही चूक नसते. दोष वाईट वेळेचा, स्थळाचा, काळाचा किंवा ठिकाण तसेच तांत्रिक दोषाचा याचाही असू शकतो.
मागील वर्षी समृध्दी महामार्गावर बुलडाणा जवळ एक ट्रॅव्हल बस अक्षरशः जळून खाक झाली. त्यात काहीजण जळून जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. पुण्यामध्ये हिट अँड रन ची केस ताजी आहे. यातील दोषींना कायद्याने कठोर शिक्षा होईलच. तर कोल्हापुरातील सायबर चौकामध्ये कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रं- कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांचा आपल्या चार चाकी गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. अशा अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे.
आज शहरात, तालुक्यात, महानगरात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात ही अनेक दुर्दैवी दुर्घटनेत अपघातात बऱ्याच जणांचा नाहक मृत्यू होतो. दुचाकी, चार चाकी असू दे अथवा तीन चाकी असू दे. अथवा कधी रेल्वे तर कधी विमान असू दे.
रेल्वे रुळावरून घसरून अपघात, विमान उड्डाणपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे अपघात, अशा अपघातांची मालिका सुरूच असते.
इतकेच कशाला सुसाट गाडी चालवणारे महाभाग पादचारी यांना धडक देतात, चिरडतात, पुण्यातील हिट अँड घटना याचे ताजे उदाहरण आहे.
अशा बऱ्याच अपघातात एखाद्याचा शरीराचा अवयव कायमचा निकामी होतो, तर काहीजण हे जग सोडून कायमचे निघून जातात. अशा अपघातात
मृत्यूमुखी पडल्यानंतर आप्त, नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो. त्यांना त्यांचा जिवाभावाचा, रक्ताचा नात्याचा जीव कायमचा सोडून जातो, तेव्हा त्यांच्या जीवाची होणारी घालमेल शब्दात मांडता येणारी नसते.
त्यांचा जीव कासावीस होतो, जीव नकोसा होतो, हे जीवन आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याने सूने सुने होते. हे सूनेपण घर खायला उठते. त्यांचे मन कुठेच लागत नाही. अशी माणसाच्या मनाची प्रचंड चलबिचल अवस्था होते. ज्याच्यावर ही दुर्दैवी वेळ गुदरते. त्याला किंवा तिलाच हे अतिव दुःख किती वेदनादायक, त्रासदायक, तापदायक आहे, हे समजू शकते. म्हणून अशा दुर्दैवी घटना कोणाच्याही जीवनात चुकूनही घडू नयेत. अशीच आपण खरी तर प्रार्थना करायला हवी.
मुळात अपघात का होतात याच्या मुळाशी जायचं म्हटलं तर, त्यामागे बरीच कारणे दिसून येतात. खरं म्हणजे निष्काळजीपणा करून गाडी चालवणं आणि अपघाताला कारणीभूत ठरन हा एक गुन्हा आहे. आपल्यासह दुसऱ्यांच्या जीविताला धोका उत्पन्न करणे, बेदरकार गाडी चालउन दुसऱ्याच्या जीविताला किंवा मालमत्तेची हानी व्हायला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरण हे देखील एक गुन्हा ठरतो.
त्यामुळे असे गुन्हे आपल्याकडून होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, त्यासाठी स्वतः बरोबर दुसऱ्याची, त्याच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. कारण आपला जीव अनमोल आहे, त्याचे मोल आपणच जाणायला हवे.
जो गाडी चालवत असतो, तो मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती सुदृढ असायला हवी. कोणत्याही तणावा शिवाय त्यांनी गाडी चालवली पाहिजे.
गाडी येत नसताना ती चालवण्याचे धाडस अंगलट येऊ शकते, अशी अनेक उदाहरणे देता येतील.
विशेषता चारचाकी गाडी चालवताना चालकाने आपला सीट बेल्ट बांधणे गरजेचे आहे. गाडी चालवताना कोणीही मोबाईलवर बोलता कामा नये, इतकेच नव्हे तर गाडी चालवताना एकमेकांशी संवाद करणे कटाक्षाने टाळले पाहिजे, जे नवशिके असतात त्यांनी गाडी परिपूर्ण आल्याशिवाय हातात घेऊ नये. गाडी सुरू असताना सिगरेट किंवा दारू पिऊ नये, किंवा गाडी दारू पिऊन चालउ नये.
आरटीओ जेव्हा एखाद्याला गाडी चालवण्याचे लायसन्स देते, तेव्हा रस्ते अपघात टाळण्यासाठी अंतर्भूत असलेल्या अटी आणि नियम यांची काटेकोर पूर्तता करूनच ते जारी केली जाते. मात्र या नियमांची पुढे काटेकोर अंमलबजावणी संबंधितांकडून केली जात नाही, असे वेळोवेळी होणाऱ्या अपघातातून स्पष्ट झाले आहे. वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. पोलीस दंडाची कारवाई करतात. पण पुन्हा चित्र ये रे माझ्या मागल्या…असे दृश्य असते.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामधील नागपूर मध्ये एक घटना घडली होती. मूळची मुंबईची असणारी तरुणी आणि तिचे कुटुंब त्या दुसऱ्या शहरात स्थायिक झाली होती. एके दिवशी ती तरुणी चारचाकी गाडी शिकत असताना तिचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रील करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते..याचा खरा तपास सुरू आहे.
असे दुर्दैवी अपघात खरंच टाळणे गरजेचे आहे. याशिवाय काही गोष्टी माणूस दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतात. दिखाउपणातून देखील काही अपघात होतात. मी किती चांगल्या पद्धतीने गाडी चालवू शकतो, माझा किती मोठा रुबाब आहे, माझा स्टेटस काय आहे, मी काय करू शकतो, मी किती श्रीमंत आणि सामर्थ्यशाली आहे, याची जणू अहमिका लागलेली असते. यातूनही अपघात होऊ शकतात. आजचे जग हे धावपळीच, पलापळीच, ताणतनावाचं आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या जगात सारे जग आपल्यापुढे निघून गेले की काय, असे वाटून राहिल्याने आपण मागे राहू नये, अशी भावना किंवा न्यूनगंड निर्माण होऊन काही गोष्टी काही कृत्य अनावधानाने म्हणा नाहीतर अतीधाडसाने हातातून घडतात आणि त्यातून पुढे असे अपघात घडतात, अथवा घडू शकतात. शक्यता आणि अशक्यता यांच्या पदोपदी बदलणाऱ्या आणि उन्ह आणि पावसासारख्या आशा, निराशेच्या खेळात
असे अपघात काळीज चर्र करून सोडतात, अर्थात काळीज चिरून टाकतात.
हे अपघात अपघात नसतातच मुळी ते असतात मना, मनावरील मोठे आघात….या होणाऱ्या आघाताची जखम शरीरावर दिसत नाही…ती मनात खोलवर कुठेतरी उमटलेली असते. तेथून अश्रू कायम ओघळत राहतात…दुःखाचा बांध ही अधून मधून फुटत असतो…ज्याच्यावर, जिच्यावर ही परिस्थिती येते, तो किंवा ती गहिवरून जातो, जाते….
त्यांचं दुःख, गहीवरन, वेदना, करुणा सगळ्यांनाच दिसत नाही.
असे अप्रिय अपघात होऊ नयेत यासाठी पुन्हा एकदा प्रबोधन, जनजागरण व्हायला हवे, चळवळ निर्माण झालीच तर सोन्याहून पिवंल…
इतकेच नाही तर प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या पातळीवर आपली जबाबदारी आणि कर्तव्य काय आहेत, याची माहिती घेऊन याचे पुन्हा, पुन्हा विचारमंथन, चिंतन, मननं हे अंतर्मुख होऊन करायला हवे. आपली एक चूक महागात पडेल, ती आपला जीव घेइलच शिवाय इतर अनेक निष्पाप, निरपराध जीवांचे जीव घेऊन जाईल, याची पक्की खूणगाठ बांधून ठेवावी आणि आपली भविष्यातील वाटचाल निकोप, सुरळीत सुरू ठेवावी. खर तर संघर्षमय जीवनातील मार्ग खडतर आहे, जीवन प्रवास हा असंख्य अडथळ्यांनी आणि अनेक आव्हानांनी भरलेला आहे.
पदोपदी भेटणारी ही आव्हाने आणि हे अडथळे निर्विघ्नपणे पार पाडून आपल्याला आपल्या मार्गावर रिस्क न घेता मार्गक्रमन करावे लागणार आहे, यासाठी आपली दृष्टी आणि जीवन प्रवासातील आपले सारथ्य निर्धोक, दोषरहित, अचूक असायला हवे. वाट कितीही बिकट असली तरी ती आपल्या चांगल्या आणि परिपूर्ण कृतीवर पुढची वाट सुरळीत, सुस्पष्ट होत जाणार आहे.
कधी कधी संशयाचे दाट धुके जाऊन जसे चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होते तसेच या जीवन प्रवासातील अडथळ्याचे आणि आव्हानांचे धुके रुपी जळमटे जाऊन जितके आश्वासक तितके आशादायी चित्र निर्माण व्हायला हवे नाही ते निर्माण करायला हवे.
पण आपल मन, चित्त एकाग्र आणि एकसंघ असेल तरच ते शक्य होणार आहे. नाहीतर येथून पुढे ही धडक ही बेधडक होत राहील…अशा धडका धडकिने मनाची धडकी भरवणारे अपघात कोणालाही कसल्याही परिस्थितीत परवडणारे अन् झेपणार नाहीत.
कारण त्यातून होणारी आर्थिक हानी जबर स्वरूपाची असते तर यातून होणारी शारारिक हानी मोठी वेदनादायक असते. या वेदना पुढील जीवनात जन्मभर भोगाव्या लागतात. असे कदापि कोणाच्या वाट्याला येऊ नये.
या जीवन प्रवासात मोठेपणा करून एकमेकांवर स्पर्धा, इर्षा करण्याऐवजी
सन्मार्गाची, समृद्धीच्या या खऱ्या स्वप्नवत प्रगतीची ही वाट आज प्रत्येकाने इथे चोखाळावी. ही वाट आपल्याला प्रगतीची दिशा दाखवेल. आती गति कधीही धोकादायक हे लक्षात ठेवावे. वेग आणि आवेग यातील खरा फरक किंवा खरी दिशा लक्षात आली की, वेगाची पारंपरिक व्याख्या बदलायला मदतच होईल…कोणत्याही परिस्थितीत मानवजातीचे कल्याण व्हावे, सरतेशेवटी हीच माफक अपेक्षा आहे.