एकमेकांचा मुडदा पाडून काय उपयोग, समाजहितासाठी तरुणाईने घ्यावा एकमेकांचा स्हयोग
गुन्हेगार निर्माण होऊच नयेत, म्हणून समाजव्यवस्थेने पुढाकार घेण्याची गरज
कोल्हापूर, (महेश गावडे)-
असे म्हणतात की, मनुष्याच्या जन्म 84 लक्ष योनीतून मिळतो, मात्र हा जन्म सार्थकी लागला तर जीवनाचे सार्थक होत नाहीतर निरर्थक आणि अस्तित्वहीन, प्रभावहीन, जगणंच वाट्याला येतं. जीवन जगण्यासाठी एक वेळ रोज भाजी भाकरी खायला लागली तरी चालेल पण चोरी, लांडी, लबाडी, कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी करता गामा नये. कोणाच्या शिव्या, शाप घेऊन, तळतळाट घेऊन जीवन कंठावं लागू नये, याची खबरदारी आज प्रत्येकाने इथे घ्यायला हवी.
तरुणांनी आपली टोळी निर्माण करायची असेल तर ती समाज विघातक नव्हे तर समाज विधायक कामासाठी निर्माण करावी. गुंडागिरी करून फाळकूट दादागिरी करून आपला प्रभाव दाखवण्यापेक्षा आपले वर्चस्व निर्माण करण्यापेक्षा समाज हिताची कामे करून, समाजाला उपयोगी पडून आपलं अस्तित्व दाखवून द्यावं.
वर्चस्व वादातून एकमेकांचे मुडदे पाडून रक्ताचे पाट वाहण्यापेक्षा गरजूंना रक्तदान शिबिर घेऊन त्यांच्याशी रक्ताचे नाते निर्माण करावे. आपल्या हातात सहजपणे आलेला पैसा चैनीसाठी उडवण्यापेक्षा आपल्या भागातील पडलेले खड्डे मुजवण्यासाठी, समाज उपयोगी उपक्रमासाठी त्याचा वापर करावा. दुसऱ्याला मारून इथं आपणही सुखाने, आनंदाने राहू शकणार नाही. हे आधी ध्यानात घ्याव. नको त्या कारणावरून
एकमेकांशी स्पर्धा, इर्षा करण्यापेक्षा, खुनशी वृत्तीने वावरण्यापेक्षा एकमेकांशी बंधुत्वाचे, सौजन्याचे, आपुलकीचे, एकतेचे एकात्मतेचे अतुट हसीना ते तरुणांनी निर्माण करायला हवे.
कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल याचा आठ ते दहा जणांनी निर्घृण खून केला. खरंच ही घटना दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, ही माफक अपेक्षा आहे.
प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला फुलाप्रमाणे सांभाळतात, त्याची काळजी घेतात त्याच्यासाठी खस्ता खातात. सुजलही याला अपवाद नसेल. मात्र वाईट संगतीमुळे आणि दिशा भरकटली गेल्यामुळे अशा मुलांचा नाहक बळी जातो याचेच वाईट वाटते. वर्षानुवर्ष इथे दोन टोळीचा युद्धाचा भडका उडतो आणि त्यात उद्या युवकाचा मुडदा पडतो…. कारण काय तर हा वाद.. हा वाद वर्चस्वाचा… हा वाद मोठेपणाचा… हा वाद श्रेष्ठत्वाचा…हा वाद स्टेटसचा…हा वाद प्रभावाचा….हा वाद अर्थकारणाचा…. आणि सोशल मीडियावरील पोस्टचाही…
अशिक्षितपणा, अल्पशिक्षणं यामुळे जगण्यामध्ये निर्माण होणाऱ्या जटील समस्या, वैचारिक प्रगल्भतेचा अभाव, अविचारीवृती,
दांडगाईपणा, कळत नकळत अंगात निर्माण होणारी दादागिरी, यंत्रणेला पुसणारी आणि समाजाला न सोसणारी आणि दबक्या आवाजात चर्चेत राहणारी फाळकूट दादांची जमात, हप्ते वसुली असे गैरधंदे सुरू राहतात. याची माहिती यंत्रणेला नसतेच असे काही नसते, असेही समाजातून बोलले जाते.
टोळी आणि टोळकीमधून काहीही साध्य होत नाही. खरंतर समाजात तरुणांच्या ऊर्जा शक्तीचा योग्य वापर व्हायला हवा. यासाठी या युवांच्या ऊर्जा शक्तीला चालना देण्यासाठी समाजातील प्रबोधनाची चळवळ राबवायला हवी.