जगावेगळा अवलिया गंगाराम आणि त्यागाची मूर्ती लक्ष्मी
एक कथा जी आपल्याला हसायला, रडायला आणि विचार करायलाही भाग पाडते..दोन पात्र आपल्याला जीवन कसं जगावं त्याचं आदर्श उदाहरण घालून देतात…त्यांच्या जीवनातील आनंद, सुख, दुःख, हाल, अपेष्टा, शोकांतिका याचेही या कथेत दर्शन घडतं..
कथा कधी अंतर्मुख व्हायला लावते तर कधी दुःख आवेगाने आक्रंदन करायला ही सांगते. जे भोग त्यांच्या वाट्याला आलेत, ते भोग, तसे वाईट दिवस, अनाकलनीय धक्के, जीवनातील अनपेक्षित आणि धोकादायक वळण याचा धावता परिचय ही करून देते….ही कथा ए
व्यथा प्रकट करते. जीवन किती अशाश्वत असू शकते ते अनाहूतपणे सांगते. त्याचे जिवंत उदाहरण नमूद करते.
ही कथा दोघांच्या एका अपूर्ण संसांराची कशी ससेहोलपट होते, आयुष्याचा एक जोडीदार निघून गेल्यावर ती माऊली आपल्या त्यागपूर्ण
वृत्तीने कसे घर चालवते. आपल्या मुलांना जीवनात स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी किती टोकाचा, धारदार संघर्ष करते….त्यांची ही एक कधीही उजेडात न आलेली ही मर्मभेदी जीवन कहाणी…आज एक म्हटल तर सुखी कुटुंब अपार दुःखात होत, वेदनेत होत होतं. घरातील कर्त्या पुरुषाच्या निघून जाण्याने त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला होता आणि शब्दशः कोणीच काही बोलायला तयार नव्हते
येणारे जाणारे सर्वजण त्या कुटुंबाचं सांत्वन करत होते. घरातील कर्ता पुरुष (गंगाराम आज हयात नव्हता. ज्याने जीवनभर आपल्या कुटुंबाचाच नाही तर समाजातील दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला, आज तोच माणूस अनंतात विलीन झाला होता. ज्याने आपल्या एकट्याच्या जीवावर दहा दहा जणांचे कुटुंब एक हाती पोसलं, अनेक कष्ट उपसले, मोठ्या खस्ता खाल्या, प्रसंगी उपाशी तापासी राहून, आपल्या पोटाला चिमटा काढत कुटुंबीयांना सुखात ठेवण्याचा कसोशीने शेवट पर्यंत प्रयत्न केला, तोच मनुष्य आज…आज जिवंत नव्हता. त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. त्या कुटुंबाला हा जबरदस्त मानसिक धक्का होता आणि या धक्क्यातून सावरणं एवढं सहज आणि सोपं नव्हतं.
नियतीन आपलं काम केलं होतं. त्या कुटुंबाचे सर्वस्व हिरावून घेतलं गेलं होतं. त्या घरात शोकाकुल वातावरण होतं. कोणी कोणाला सावरायचं हा प्रश्न होता. त्यांच्या कुटुंबाला अतिव दुःख झालं होत. त्यांच्या निधनानंतर काय करावं आणि कुठ जावं काहीच त्या कुटुंबाला उमजत, समजत नव्हतं. तो घरातील एकमेव कर्ता पुरुष होता आणि त्याला त्याच्या संसाराला खंबीर साथ देणारी अर्धांगिनी ( लक्ष्मी) आता एकटी पडली होती. ज्याने आयुष्यभर साथ देण्याची हमी दिली होती, तोच अर्ध्यावर साथ सोडून गेला होता.
त्याची अर्धांगिनी जणू गतप्राण झाली होती. ती कोलमडून गेली होती. तिचा प्राणप्रिय सखा तिला कायमचा सोडून गेला होता. तिनेही आपल्या संसारासाठी मोठा त्याग केला होता.
घरातल्या जबाबदारीचं टेन्शन आपल्यावर आपल्या कारभाऱ्याकडून कधी कधी मारही तिने खाल्ला होता.
तिने सुखी संसारासाठी हा त्रास ही निमूटपणे सहन केला होता. कधी चटणी भाकर खाऊन तर कधी झालेल्या भांडण याच्यामुळे उपाशी ही राहाव लागायचं..
या जुन्या आठवणी, हे सर्व तिला सार, सार आठवत होतं. काही दशकांपूर्वी जेव्हा तिने त्याच्या गळ्यात माळ घातली आणि त्याच्या घरात प्रवेश केला तेव्हापासूनचा त्यांच्या संसाराचा प्रवास झपकन तिच्या डोळ्यासमोर तरळला. तेव्हा अगदी लहान वयातच मुलींची लग्न लावून दिली जात असत. तेव्हाचा तो काळ होता. लग्न म्हणजे काय हे समजायचं तेव्हा ते वय नव्हतं, होतं ते वय अल्लड आणि खेळण्या बागडण्याच, झोपाळ्यावर झोके घेऊन गाणी गायचं, स्वप्नांच्या दुनियेत अलगदपणे रममान व्हायचं, आपला हट्ट पालकांकडू
पूरउन घ्यायचं. मात्र त्याच वयात लक्ष्मी हिला मोठं कष्ट उपसावं लागलं. 4 बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा परिवार अगदी पहिली दुसरी इयत्तेतून शिक्षण अर्धवट सोडून तिला शेती कामाकडे आणि तीन लहान बहिणीकडे लक्ष द्यावे लागले.
शेतात राब राब राबव लागलं. एक प्रकारे तिला घर सांभाळावं लागलं, तिच्या खांद्यावर कोवळ्या वयात मोठी जबाबदारी पडली. मोठ्या ताकदींची काम तिला अल्प वयातच करावी लागली. त्यात तिच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला. यावेळी तिला काय वाटत होतं. तिची इच्छा काय होती, तिला लग्न करायचं होतं की नव्हतं, याचा काहीही विचार तिच्या आई-वडिलांनी केला नाही. तो दोष कदाचित तिच्या पालकांचा होताच पण त्याआधी बुरसटलेल्या मानसिक विचाराने बरबटलेल्या तत्कालीन सामाजिक प्रवृतीचा देखील होता. कारण त्याकाळी मुलगीला ओझं समजलं जायचं आणि तिचे हात लवकर पिवळे केले जायचे. मात्र असे करताना त्या नाजूक वयामध्ये तिची ही शारीरिक आणि मानसिक ओढाताण व्हायची, परिस्थितीने लादलेली बरीच ना आवडीची कामे तिला नाईलाजाने करावी लागायची. त्यात तिची
मुस्कटदाबी आणि कुचबना व्हायची, याचा काडीमात्र विचार होत नव्हता त्याकाळी. तिने पाहिलेली स्वप्न धुळीस मिळवली जायची. असाच प्रकार त्या अर्धांगिनी बाबत झाला होता. जे सुख किंवा ज्या इच्छा अपूर्ण होत्या त्या लग्ना नंतर पूर्ण होतील अशी तिची अपेक्षा होती. ज्या इच्छा तिला लग्नापूर्वी पूर्ण करायच्या होत्या, त्यातील काही इच्छा लग्नानंतर तरी पूर्ण व्हाव्यात, अशी तिची मनीषा होती, जे स्वप्न तिने विवाह वेदीवर चढण्यापूर्वी पाहिलं होतं. त्यातील एखाद, दुसरे स्वप्न तरी लग्नानंतर काही दिवसांनी, काही काळाने पूर्ण होईल असा तिचा समज होता. मात्र ही अपेक्षा, हे स्वप्न, आणि हा समज धुळीला मिळाला होता. त्याची जागा अपेक्षाभंग, स्वप्नपूर्तीची अपूर्णता आणि गोड गैरसमज यांनी घेतली होती. (तेव्हा त्यांच्या संसारावर बेतलेली परिस्थिती ही तशीच होती. त्या रहाटगाडग्यात तिच्या साथीदाराने जणू आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचा अंत झाला.
कालांतराने त्या दोघांच्या संसाराच्या वेलीवर तीन फुले फुलली. मात्र त्याच्या अंगावर त्याची आई, वडील, 4 भाऊ, 4 बहीण आणि आपल्या संसाराची जबाबदारी देखील होती. ती जबाबदारी पार पाडताना त्या घरातील कर्त्या पुरुषाला मोठी तडजोड करावी लागत होती. आर्थिक ओढाताण होत होती. जेव्हा कोकणातून हा कर्ता मुलगा, उमद्या वयात कोल्हापुरात आला. तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हते. ना राहायला छत ना कुठे घर घेण्याची आर्थिक पत. ना आवश्यक शिक्षण ना एखाद भांडवल. अशा परिस्थितीत त्या मुलाने अल्पशिक्षण घेऊनही बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. प्रसंगी सिनेमाच्या थिएटरमध्ये गोष्टीची पुस्तके विकून उदरनिर्चाह केला. हॉटेलमध्ये वेटरचे काम केलं, लक्ष्मीपुरी मधील जाधव दवाखान्यात शिकाऊ कंपाउंडरचे काम केल. अनेक कला त्यांच्या अंगात होत्या.
(कोकणातील गावी असलेल्या कुटुंबासाठी 2 महिन्यातून एकवेळा कोल्हापूर मधून एसटी मधून जात बाजार भरत असत. शेवटी त्याच्या प्रामाणिकपणा, कष्ट घ्यायची वृत्ती आणि बुद्धी चातुर्यमुळे त्याला त्या दवाखान्याच्या डॉक्टर यशवंत जाधव यांनी बेसमेंट मध्ये कॅन्टीन भाड्याने चालू करण्याची परवानगी दिली. एका साथीदाराला हाताशी घेत त्या तरुणाने हॉटेल धंदा सुरू केला. आणि बघता बघता या धंद्यात त्याचा जम बसू लागला. या धंद्याच्या जोरावर त्याने आपले कोकणातील झोपडी वजा घराचे रूपांतर मजबूत दगड आणि मातीच्या घरात केले. आपल्या तीन भावांना आणि एका बहिणीला शहरांमध्ये आणून त्यांना शाळेत घातले. एक छोटी भाड्याची खोली घेऊन त्यात त्यांचा दहा बाय दहाच्या खोलीत सुखाचा संसार सुरू होता. त्या घरातील कर्त्या पुरुषांन आपल्या हॉटेलच्या धंद्यावर नागला पार्क झोपडपट्टी मधील (सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे) काही गरजू मुले यांना कामावर ठेवले. त्यांना नागळा पार्क येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्याकडून मीटिंग साठी चहा, नाश्ता यांच्या ऑर्डर मिळू लागल्या.
कोकणातून कोणी जर त्या दवाखाण्यात दाखल झाले तर त्यांना इतर रुग्ण प्रमाणे त्यांची परिस्थिती बघून लागेल ते सहकार्य करत. त्यांना उधारीवर नाश्ता, चहा पाणी देत, मात्र त्यांच्याकडून डिस्चार्ज वेळी आपले बिल त्या पेशंटच्या नातेवाईकांनी चुकवावे अशी अभिलाषा ते करत नसत. उलट काही गोर गरीब लोकांकडून जेवणाचे, नाश्त्याचे पैसे घेत नसत. इतका संवेदनशीलपणा त्यांच्या ठायी वास करत होता.
म्हणून आज जवळपास 33 वर्षानंतरही कोकणातून जर येथे संबंधित पेशंटचे नातेवाईक किंवा पेशंट आले तर त्या व्यक्तीचं नाव (गंगाराम यांचे) आजही काढतात, आदराने घेतात. त्यांचे एक वैशिष्टय किंवा वेगळेपण म्हणजे ते आपल्या सायकलवर मागे कॅरेज आणि पुढे कुत्र्यांच्या पिलांना
बसउन सकाळी हॉटेल किंवा चहा गाडीच्या धंद्यावर जात असत. दरम्यान, त्यांच्याकडे कामावर ठेवलेल्या झोपडपट्टीतील काही मुलांना जुगार पत्ते खेळण्याचे वाईट व्यसन लागले होते. एक दिवशी त्यांना हे समजताच त्या मुलांना on the spot त्यांनी चांगला धडा शिकवला, जन्माची अद्दल घडवली. कारण कामावरच्या या आर्थिक मागास आणि अत्यंत गरीब वर्गातील मुलांना देखील ते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत असत.ते चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत, वाईट संगत लागू नये, हाच त्यांचा प्रयत्न असायचा. याच कामगारांपैकी एक मुलगा पुढे जाऊन मिलिटरी मध्ये भरती झाला. तेव्हा त्याचा जाहीर सत्कार मीटिंग संपल्यावर नागळा पार्क मधील रोटरी क्लबच्या हॉल परिसरात त्यांनी केला. त्यांची
कोकणातील गावात भातशेती होती. त्यासाठी ते अधून मधून आवर्जून शेतीच्या कामासाठी जात. कोकणातील गावी गेल्यावर शेजारी पाजारी आपल्या सारख्या आर्थिक मागास वर्गातील लोकांना भेट म्हणून काही पैसे खर्चाला देत असत. कोल्हापूर मधील आपल्या तीन भाऊ यांना त्या कर्त्या पुरुषाने आपल्या पायावर उभे करण्यात सिंहाचा वाटा उचलला. दोन बहीण यांची लग्न लाऊन दिली. आज 33 वर्षानंतर लक्ष्मी हिच्या डोळ्यासमोरून हा संघर्षमय, अनेक खाच खळग्यानी, दगड धोंड्यांनी भरलेला जीवन प्रवास सरकत जातो तेव्हा तेव्हा तिचे डोळे भरून येतात. त्यात दुःख अश्रू बरोबर आनंदाश्रू देखील असतात
इतकेच नाही तर स्वतः ची 3- 3 ऑपरेशन होऊन देखील ती या वयात देखील कष्ट उपसत आहे. यातील एक मोठा अपघात 2019-20 दरम्यान झाला. कोल्हापूर ते बेळगाव मार्गावरील Twandi घाट मार्गावर रिक्षा पलटी होऊन रिक्षा लक्ष्मी हिच्या हातावर पडली. मेजर ऑपरेशन करावं लागलं तिच… मांडीची स्किन काढून हाताचे ऑपरेशन करावे लागले. अशी एक ना अनेक संकट आणि त्यांची मालिका तिच्यावर येऊनही ती त्याला तोंड देत आहे. जशी परिस्थिती येईल, त्यानुरूप जीवन कंठावे लागत आहे.
देवापुढे ती प्रार्थना करत आहे.आता तू आमची किती परीक्षा घेणार आहेस, आता तरी चांगले दिवस दाखव बाबा…असे साकडे घालत आहे….
खरे तर आपल्या पतीच्या मागे तिने जीवनाच्या विविध टप्प्यांवर सोसलेले हाल, आपल्या तीन मुलांना शिकउन मोठं करण्यासाठी घेतलेली मेहनत, तिचा त्याग यामुळे आज तिची तिन्ही मुलं स्वतः च्या पायावर उभी आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या मुलांच्या संसारावर कधी कधी संकट येतं तेव्हा तेव्हा हीच लक्ष्मी देखील निडरपणे त्या संकटाना समोर जाते. आपल्या मुलांना योग्य सल्ला, मार्गदर्शन करते. त्यामुळे ती एक प्रकारे आईबरोबर त्यांच्या वडिलांचीही भूमिका निभावते
तिच शरीर थकलेलं आहे, डोळे कमजोर झालेत, वय वाढलेलं आहे, मात्र सतर वयापर्यंत पोहचता पोहचता आपल्या आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी आजही रक्ताच पाणी ती करत आहे.
तिच्या समर्पणाला, त्यागाला तोड नाही. ती माऊली एका देवदुतासारखी आपल्या मुलांच्या पाठीशी राहत आहे. आपल दुखणंखुपणं विसरून दुसऱ्यांच्या दुःखावर, वेदनेवर फुंकर घालत आहे. आपल सुख विसरून ती दुसऱ्याचं म्हणजेच कुटुंबातील सदस्यांचं दुःख समजून घेत आहे. त्यांचं दुःख हलक करून ती त्यात आपला खरा आनंद शोधत आहे. आपल्या यातना विसरून ती आपल्या परिवारातील सदस्य यांचं दुःख किंवा अडचणी कशा कमी होतील, हेही पाहत आहे.त्यातून बाहेर कसे पडता येईल, याचा मार्ग त्यांना शोधून दाखवत आहे. स्वतः साठी कमी ती इतरांसाठी जास्त जगत आहे…ती खऱ्या अर्थाने त्या घराची लक्ष्मी ठरली आहे. वरद लक्ष्मी म्हटल तरी चालेल..